
नांदेड - इतर सामान्य मुलांप्रमाणेच स्वमग्न मुलांकडे देखील प्रचंड एनर्जी असते, मात्र इतर मुलांप्रमाणे त्यांची एनर्जी खर्च होत नाही. तिचा योग्य वापर नसतो. यामुळे स्वमग्न मुले ही इतर मुलांपेक्षा स्वभावाने थोडी वेगळी असतात. त्यांच्यात हट्टखोरपणा जास्त दिसून येतो. ते स्वाभाविकच आहे. म्हणून अशा मुलांना शाळेत किंवा इतर कामामध्ये गुंतवून ठेवणे हा एकमेव पर्याय पालकांजवळ असतो. लॉकडाउनच्या काळात या मुलांना सांभाळणे थोडे कठीणच आहे. तेव्हा इतरांना देखील त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणे गरजेचे असल्याचे मत डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी व्यक्त केले.
सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळेतील मुलांना घरी पाठविण्यात आले आहे. परंतु ती मुले घरी शांत बसत नाहीत. शिवाय घर छोटे असल्याने त्यांना सांभाळण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा वेळी त्यांना घराबाहेर थोड्या मोकळ्या हवेत नेऊन त्यांना खेळण्यासाठी मोकळीक दिली जावी. स्वमग्न मुलांमधील एनर्जी खर्च झाली पाहिजे. तेव्हा कुठे ही मुले दमून शांत होतील. त्यांच्यातील हट्टीपणा कमी होईल, यासाठी पालकांसोबतच आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांनी देखील त्यांच्या भावनांची कदर करावी.
स्वमग्न मुले ही इतर मुलांपेक्षा स्वभावाने हट्टी असतात. त्यांना जे हवंय असते त्यासाठी ते काहीपण करण्यास मागे पुढे बघत नाहीत. अशा मुलांनी घरात राहून गडबड करु नये, यासाठी त्यांच्या आवडीचे खेळ, अभ्यास, रंगकाम, भरतकाम अशा गोष्टी करण्यासाठी मोकळीक दिली जावी. शक्य असल्यास त्यांना संध्याकाळच्या वेळी जेवणापूर्वी घराबाहेर फिरण्यास घेऊन जावे. जेणे करुन त्यांच्यातील उर्जा खर्च होईल. याची काळजी लॉकडाउनमध्ये घेतली गेली पाहिजे, असे डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.