व्हिडिओ: नागनाथ मंदिरात होते दिवसातून तीन वेळेस पूजा

कृष्णा ऋषी
Thursday, 16 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा येथील नागनाथ मंदिराची चारही प्रवेशद्वारे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली असली तरी नागनाथ मंदिरात संस्थानतर्फे नियमित पूजा केली जाते. या मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी हे दररोज तीन वेळेस नागनाथाची पूजा करतात. 

औंढा नागनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र, मुख्य पुजाऱ्याच्या उपस्थितीत नियमित तीन वेळेस पूजा करण्यात येत आहे.

औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर आठवे जोतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे उत्सव भरतो. यानिमित्त हजारो भाविक दाखल होतात. तसेच वर्षभर राज्यासह परराज्यांतून भाविक नागनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. यामुळे येथे नेहमी गर्दी असते.

हेही वाचाहिंगोलीकरांना दिलासा; कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला निगेटीव्ह

पर्यटकांचीही वर्दळ

 तसेच येथे भाविकांसह पर्यटकासांठी उभारण्यात आलेल्या नागनाथ उद्यान, नौकायानचादेखील पर्यटक आनंद घेतात. येथे येणाऱ्या भाविकांमुळे मंदिराच्या परिसरात प्रसादालये, विविध धार्मिक साहित्य विक्रीची दुकाने, बेलफूल विक्रेते यांचा दिवसभर होणाऱ्या विक्रीतून प्रंपच चालतो. 

भाविकांची वर्दळ थांबली

तसेच मंदिरात बसणारे वासुदेव यांचादेखील दानधर्मातून उदरनिर्वाह होतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे येथील भाविकांची वर्दळ थांबली आहे. मंदिराची चारही प्रवेशद्वारे बंद करण्यात आल्याचे फलकही लावण्यात आले आहेत. 

तीन वेळेस नागनाथाची पूजा

भाविकांची वर्दळ थांबली असली तरी नागनाथ मंदिरात संस्थानतर्फे नियमित पूजा केली जाते. या मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी हे दररोज तीन वेळेस नागनाथाची पूजा करतात. मोजकेच पूजारी या वेळी उपस्थित असतात. तसेच मंदिर परिसराची चार कर्मचारी साफसफाई करतात, अशी माहिती श्री नागनाथ देवस्थानचे विश्वस्त गणेश देशमुख यांनी दिली.

शिवभोजन योजना सुरू 

दरम्यान, येथे नागनाथ संस्‍थानतर्फे अन्नछत्र चालविण्यात येत होते. लॉकडाउनच्या काळातदेखील मंदिर समितीने हा उपक्रम सुरू ठेवून गरजूंना अन्नदान केले. त्‍यानंतर शासनातर्फे शिवभोजन योजना येथे सुरू झाल्यानंतर मंदिर समितीतर्फे चालविण्यात येणारे अन्नछत्र बंद करण्यात आले आहे

येथे क्लिक कराविहिरीत पडून आजोबासह नातीचा मृत्यू

देशभरातून भाविक होतात दाखल 

श्री नागनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. परिसरात वन विभागाचे पर्यटन स्थळ उभारण्यात आले आहे. येथे मुक्काम करूनच परिसरातील देवस्थानाचे दर्शन भाविक घेतात. त्यामुळे येथील हॉटेल, लॉजमध्ये भाविकांची गर्दी असते. या माध्यमातून औंढा शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. 

मध्यवर्ती ठिकाण

औंढा येथूनच नांदेड, परभणी, जिंतूर, रिसोड, हिंगोली, अकोला मार्गे बसेस धावतात. त्यामुळे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. तसेच भाविकांचीही वर्दळ असते. यातून एसटी महामंडळाला आर्थिक मदत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Nagnath was worshiped in the temple three times a day Hingoli news