विहिरीत पडून आजोबासह नातीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

बोडखी येथील सोनाली धवसे तहान लागल्याने विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा तोल जावून ती विहरीत पडली. त्यामुळे आजोबांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघांचाही मृत्यू झाला.
 

हिंगोली : पाणी आणण्यासाठी गेलेल्या नातीसह आजोबाचा विहितील पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोडखी येथे बुधवारी (ता. १५) सकाळच्या वेळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.  

हिंगोली तालुक्‍यातील बोडखी येथील मुकिंदा धवसे (वय ६५) व सोनाली धवसे (वय ११) हे ब्राम्‍हणवाडा शिवारातील शेतात गेले होते. या वेळी तहान लागल्याने सोनाली विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. 

हेही वाचाजिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ निर्णयामुळे हिंगोलीकरांना काहीसा दिलासा...

दोघांचाही झाला मृत्‍यू

या वेळी तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. सोनाली विहिरीत पडल्याचे लक्षात येताच आजोबा मुकिंद धवसे यांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र, यात दोघांचाही मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे बिट जमादार नंदकुमार मस्‍के यांनी घटनास्थळी भेट दिली.

नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू

 दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते शवविच्‍छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या बाबत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

दोघास लोखंडी रॉडने मारहाण

आखाडा बाळापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने डोक्‍यात मारून जखमी केल्याची घटना डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी चौघांवर बुधवारी (ता.१५) आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंगरकडा येथील घटना

कळमुनरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथील सुनील गवळी हे मंगळवारी (ता.१४) रात्री साडेसात वाजता डोंगरकडा फाटा येथे चुलते जेठन गवळी याच्याकडे गेले होते. या वेळी जुन्या भाडणाच्या कारणावरून सुनील व त्‍याचा भाऊ नागेश यांना राजू काळबांडे, रवी लोखंडे, धम्‍मदीप काळबांडे, मिलिंद लोखंडे (सर्व रा. डोंगरकडा) यांनी लोखंडी रॉडने मारून डोक्यात दुखापत केली.

येथे क्लिक करावादळी वारे, मेघगर्जना अन् पावसाची हजेरी, कुठे ते वाचा...

हिंगोलीत पाचशे दुचाकी जप्त

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांतर्फे कारवाई केली जात असून आतापर्यंत पाचशे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतर दंडात्‍मक कार्यवाही करून दुचाकी सोडून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सय्यद यांनी दिली.

विनाकारण फिरविण्यास मनाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (ता. १७) मार्चपासून संचारबंदी सुरू आहे. या कलावधीत विनाकारण रस्‍त्‍यावर दुचाकी फिरविण्यास मनाई करण्यात आली होती. तसे जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले होते. आदेशाचे पालन न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत दुचाकी जप्त करण्यात आल्या. आतापर्यंत ५०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकी शहर पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandfather's grandson dies after falling into a well Hingoli news