व्हिडिओ : हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीस सुरवात

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : जिल्‍ह्यात तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरवात केली आहे. अनेकांनी पेरणी, तर काहींनी हळद लागवडीला सुरवात केली आहे.

जिल्‍ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून पाऊस सुरू झाला आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांत कमी - अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४३ अंशांपर्यंत गेलेले तापमान २९ अंशांवर आले आहे. 

मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत 

वातावरणात झालेला कमालीचा बदल हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पेरणीपूर्व राहिलेली कामे ट्रॅक्‍टरच्या मदतीने केली जात आहेत. उन्हाळ्यात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. जिल्‍ह्यात तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. बहुतांश शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

ड्रीप अंथरून हळद लावण्याचे काम

मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी मूग, उडीद व सोयाबीनची पेरणी सुरू केली आहे. वसमत शहर व परिसरात मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी केली जात आहे. हळद उत्‍पादक शेतकऱ्यांनीदेखील हळद लागवडीसाठी जमिनीची मशागत करून ड्रीप अंथरून हळद लावण्याचे काम सुरू केले आहे. औंढा शहरातील काही शेतकरी हळद लागवड करीत आहेत. तर वसमत तालुक्‍यातील गिरगाव भागातदेखील हळद उत्‍पादकांनी लागवडीचे काम हाती घेतले आहे.

हळदीला हमीभाव द्यावा

गिरगाव : वसमत तालुका हळदीसाठी प्रसिद्ध असून या भागात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड केली जाते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वसमत येथील हळद मार्केट आहे. बहुतांश शेतकरी गटाच्या माध्यमातून हळद लागवड करून विक्री करतात. 

हळदीच्या दरात घसरण

दरवर्षी हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. हळदीला सुरवातीला १४ ते १५ हजारांचा भाव मिळाला होता. मात्र, त्यानंतर लॉकडाउनमुळे हळदीच्या दरात घसरण झाली असून लागवडीसाठी झालेला खर्च पाहता शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. शासनाने हळदीला हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार होणार आहे.

बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे व खत खरेदीची लगबग सुरू झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग बियाणे खरेदीला प्राधान्य दिले असून खताचीदेखील खरेदी सुरू झाली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले जात आहे.

कापाशीच्या बियाणालाही पसंती

 विविध कंपनींचे बियाणे उपलब्ध झाले असून बियाणाची ३० किलोची बॅग दोन हजार ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत मिळत आहे. कापाशीच्या बियाणालाही पसंती दिली जात आहे. तूर बियाणेही एक किलो एक किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहे. मुगाचे बियाणे दोन किलो, पाच किलो बॅगमध्ये उपलब्ध आहे. तसेच खताची खरेदी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकरी पेरणीच्या कामात गुंतला जाणार असल्याचे चित्र आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com