Vidhan Sabha 2019 : युतीसमोर आघाडी टिकवण्याचे आव्हान

मंगेश शेवाळकर
Thursday, 22 August 2019

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

विधानसभा 2019 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मधील निवडणुकीत हिंगोलीमध्ये भाजप, कळमनुरीत काँग्रेस; तर वसमतमध्ये शिवसेना विजयी झाली आहे. त्या वेळी आघाडी आणि युती नसताना स्वबळावर हे उमेदवार विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत लोकसभेच्या हिंगोली जागेवर काँग्रेसने विजय मिळविला होता. मात्र, या वेळी काँग्रेसला वरचष्मा राखता आला नाही. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील तब्बल पावणेतीन लाख मतांनी विजयी झालेत. माजी खासदार आणि शिवसेनेतून भाजपमध्ये आणि निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन हिंगोलीतून लोकसभेसाठी काँग्रेसचे तिकीट मिळवले होते; पण सुभाष वानखेडेंना पराभव पत्करावा लागला.

मागील विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांनी काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सतत लढत राहिली आहे. या वेळी आमदार मुटकुळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. काँग्रेसकडून गोरेगावकर यांच्यासह सुरेश सराफ, विनायकराव देशमुख इच्छुक आहेत. या शिवाय शिवसेनेकडून राजेश पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार रामराव वडकुते तर वंचित बहुजन आघाडीकडून वसीम देशमुख इच्छुक आहेत.

कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपकडून माजी आमदार गजानन घुगे, राष्ट्रवादीकडून दिलीप चव्हाण, शिवसेनेकडून संतोष बांगर, रासपकडून विनायक भिसे, तर वंचितकडून अजित मगर आणि ॲड. रवी शिंदे इच्छुक आहेत.

वसमत मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि राजू चापके, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राजू नवघरे इच्छुक आहेत. भाजपकडून ॲड. शिवाजी जाधव, तर काँग्रेसकडून डॉ. एम. आर. क्‍यातमवार, वंचित बहुजन आघाडीकडून फैसल पटेल हे इच्छुक आहेत.

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षीय इच्छुकांचा वैयक्‍तिक संपर्क आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला तिन्ही मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली असली तरी, विधानसभा निवडणुकीत युतीसमोर मतांची आघाडी टिकवण्याचे आव्हान आहे. प्रचारासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते येणार असले तरी, त्याचा फारसा फरक विधानसभेच्या निवडणुकीत पडत नाही. ती वैयक्‍तिक संपर्कावर होणार असल्याचे चित्र आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे प्रस्थापित पक्षीय उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019 Hingoli District Yuti Aghadi Politics