Vidhan Sabha 2019 : बंडखोरी, नाराजीमुळे चौरंगी लढती

मंगेश शेवाळकर
Sunday, 6 October 2019

भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हिंगोली जिल्ह्यात नाराजांनी रिंगणात उतरण्याचे ठरविल्याने आणि ‘वंचित’नेही उमेदवार उभे केल्याने चौरंगी लढती आहेत.

विधानसभा 2019  
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हिंगोली जिल्ह्यात नाराजांनी रिंगणात उतरण्याचे ठरविल्याने आणि ‘वंचित’नेही उमेदवार उभे केल्याने चौरंगी लढती आहेत.

जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांत चौरंगी लढती आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे प्रस्थापितांसमोर आव्हान असेल. जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मधील निवडणुकीत हिंगोलीमध्ये भाजप, कळमनुरीत काँग्रेस, तर वसमतमध्ये शिवसेनेचा आमदार झाला. त्या निवडणुकीत आघाडी आणि युती नसतानाही स्वबळावर हे उमेदवार विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालेत. 

हिंगोली मतदारसंघात भाजपकडून आमदार तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसकडून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित आघाडीकडून वसीम देशमुख; तर प्रहार जनशक्‍तीचे ॲड. विजय राऊत रिंगणात आहेत. सर्वांनी प्रचार सुरू केलाय. मतदारसंघात काँग्रेस व भाजप यांची पारंपरिक लढत वंचित आघाडी व प्रहारमुळे चौरंगी झाली आहे.

कळमनुरीमध्ये काँग्रेसकडून आमदार डॉ. संतोष टारफे, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर, ‘वंचित’तर्फे अजित मगर रिंगणात उतरलेत. भाजपचे माजी खासदार ॲड. शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे हेही अपक्ष रिंगणात उतरलेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे विनायक भिसेदेखील रिंगणात असून, लढत बहुरंगी होईल. अर्ज माघारीनंतर चौरंगी लढत होईल, असे बोलले जाते.

वसमतमध्ये शिवसेनेकडून आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीकडून राजू नवघरे, ‘वंचित’कडून मुनीर पटेल; तर भाजप नेते ॲड. शिवाजी जाधव अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. येथेही चौरंगी लढतीची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत पक्षीय इच्छुकांचा वैयक्‍तिक संपर्क आहे. याशिवाय काही दिवसांपासून इच्छुकांनी गावोगावी दौऱ्यांनी संपर्क वाढविला आहे. ‘वंचित’मुळे निवडणुकीत चुरस आहे. मात्र, बंडखोर नेते काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष आहे.

निवडणुकीत गाजणारे प्रश्‍न
हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीस प्रोत्साहन देणे
जास्तीत जास्त उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करणे
शेतीपंपांसाठी २४ तास योग्य दाबाने वीजपुरवठा करणे
सिद्धेश्वर पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Mangesh shewalkar article on political party