Vidhansabha 2019 : इच्छुकांच्या भाऊगर्दीने बहुरंगी लढती

अभय कुळकजाईकर
Thursday, 8 August 2019

नांदेड जिल्ह्यात आतापासूनच चुरस वाढली असून, इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष तसेच बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत.

नांदेड जिल्ह्यात आतापासूनच चुरस वाढली असून, इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष तसेच बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून, २०१४ च्या निवडणुकीत आघाडी किंवा युती नव्हती. सगळेच स्वबळावर लढले होते. त्यात शिवसेनेला चार (नांदेड दक्षिण, हदगाव, देगलूर आणि लोहा), काँग्रेसला तीन (नांदेड उत्तर, भोकर आणि नायगाव) आणि राष्ट्रवादी (किनवट) आणि भारतीय जनता पक्ष (मुखेड) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. २०१४ च्या नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मोदी लाटेतही ८१ हजार मतांनी निवडून आले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर ४० हजार मतांनी निवडून आले. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील, तर लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे निवडून आले.

सध्या भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्याला नांदेड जिल्हाही अपवाद नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपात जातील, अशी चर्चा आहे. यापूर्वीही अनेक दिग्गज भाजपमध्ये गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बॅंकेतही चिखलीकरांनी ‘प्रताप’ दाखवत हळूहळू नाराजांची मोट बांधण्याचे सत्र सुरू केले आहे. जिल्ह्यावर पूर्वी काँग्रेसचे म्हणजेच अशोक चव्हाण यांचे वर्चस्व होते. मात्र, आता त्यांची पकड सैल होत आहे. चव्हाण यांच्याविरोधात विरोधक एकत्र आल्यामुळे प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दुसरीकडे, ‘वंचित’नेसुद्धा लोकसभा निवडणुकीत चांगली मते घेत युती आणि आघाडीला आव्हान दिले आहे. ‘वंचित’मध्ये ‘एमआयएम’ असल्यामुळे त्यांच्या मतांचा टक्का वाढला. त्याचबरोबर छोट्या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

नांदेड दक्षिणमधील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार झाले आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपतर्फे दिलीप कंदकुर्ते, डॉ. संतुक हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, प्रणिता देवरे चिखलीकर इच्छुक आहेत. ‘वंचित’मधील ‘एमआयएम’तर्फे फेरोज लाला, मकबूल सलीम तसेच काँग्रेसकडून अब्दुल सत्तार, नरेंद्र चव्हाण यांची नावे आहेत.

नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे आमदार डी. पी. सावंत पुन्हा इच्छुक असून, भाजपतर्फे ओमप्रकाश पोकर्णा, मिलिंद देशमुख तर शिवसेनेकडून दत्ता पाटील कोकाटे, बालाजी कल्याणकर इच्छुक आहेत. ‘वंचित’तर्फे प्रा. यशपाल भिंगे, प्रशांत इंगोले, डॉ. संघरत्न कुऱ्हे आदींची चर्चा आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड हेदेखील रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

नायगावमधून काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण हेच उमेदवार राहतील. भाजपकडून राजेश पवार, डॉ. मीनल पाटील खतगावकर, तर ‘वंचित’कडून डॉ. शिवाजी कागडे यांच्या नावाची चर्चा आहे. देगलूरमधून शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांच्या विरोधात काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर, व्ही. जे. वरवंटकर यांच्यासोबत लढतीची शक्‍यता आहे. ‘वंचित’कडून प्रा. उत्तमकुमार कांबळे, डॉ. उत्तम इंगोले तर भाजपकडून मारोती वाडेकर इच्छुक आहेत.

भोकर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अशोक चव्हाण उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. माधव किन्हाळकर, बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या गोरठेकर यांचा भाजपप्रवेश निश्‍चित मानला जात आहे. शिवसेनेकडून डॉ. उत्तम जाधव, धनराज पवार, बबन बारसे तर ‘वंचित’कडून दत्ता डोंगरे, नागोराव शेंडगे यांची नावे आहेत. 

मुखेडला भाजपकडून आमदार डॉ. तुषार राठोड पुन्हा इच्छुक असले, तरी त्यांचे बंधू गंगाधर राठोड, सनदी अधिकारी रामदास पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचीही नावे आहेत. काँग्रेसकडून हणमंत पाटील बेटमोगरेकर आणि शेषराव चव्हाण, तर ‘वंचित’कडून डॉ. रामराव श्रीरामे, शिवाजी गेडेवाडा यांची नावे पुढे आली आहेत. हदगावमध्ये शिवसेनेकडून आमदार नागेश पाटील आष्टीकर, तर काँग्रेसकडून माधव पाटील जवळगावकर आणि गंगाधर पाटील चाभरेकर इच्छुक आहेत. ‘वंचित’कडून इश्‍तियाक अहमद, दिलीप परघणे, डॉ. उत्तम शिंदे; तर भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे नाव चर्चेत आहे. 

लोहामधून भाजपकडून खासदार चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण व कन्या प्रणिता देवरे चिखलीकर तसेच भाऊजी श्‍यामसुंदर शिंदे; तर ‘राष्ट्रवादी’कडून शंकरअण्णा धोंडगे, शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे आणि काँग्रेसकडून रोहिदास चव्हाण, एकनाथ मोरे यांची चर्चा आहे. ‘वंचित’कडूनही रामचंद्र येईलवाड इच्छुक आहेत. 

किनवटमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रदीप नाईक हेच पुन्हा उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजपकडून अशोक पाटील सूर्यवंशी, संध्या राठोड, धरमसिंग राठोड; तर शिवसेनेकडून ज्योतिबा खराटे, सचिन नाईक आणि राजश्री पाटील यांची चर्चा आहे. माकपतर्फे अर्जुन आडे तर ‘वंचित’कडून प्रा. किशन मिरासे, प्रा. हेमराज उईके यांची नावे आहेत. माजी आमदार भीमराव केरामही हेदेखील इच्छुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Congress NCP Shivsena BJP Interested Candidate Politics