तेलंगणाशी जोडणारी सीमा गावकऱ्यांनी केली बंद

अनिल कदम
Thursday, 9 April 2020


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. आठ) सांगवी उमर या गावातून तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीमा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी सील केल्या आहेत. मात्र, कर्नाटकला जोडणाऱ्या नागराळ रस्त्यावरील वाहतूक सुरूच असल्याने या भागातील नागरिकात भीतीचे सावट पसरलेले आहे.

देगलूर, (जि. नांदेड) ः देगलूर शहराला तेलंगणा, कर्नाटक या दोन राज्यांची सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असून त्यापलीकडे आंध्रप्रदेशची सीमा लागत असते. शेजारील राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सीमावर्ती गावातील नागरिकांनी त्या त्या राज्यांना जोडणाऱ्या सीमा बंद केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. आठ) सांगवी उमर या गावातून तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीमा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी सील केल्या आहेत.
मात्र, कर्नाटकला जोडणाऱ्या नागराळ रस्त्यावरील वाहतूक सुरूच असल्याने या भागातील नागरिकात भीतीचे सावट पसरलेले आहे.

तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर
देगलूरपासून तेलंगणा व कर्नाटकला जोडणारी सीमा अगदी जवळच्या अंतरावर आहे. मुख्य मार्गावरील रस्त्यावर पोलिसांची करडी नजर असली तरी ग्रामीण भागातील रस्त्यातून पळवाटा शोधत नागरिकांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची वर्दळ दिसून येत आहे. यासाठी आता त्या त्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी सतर्क राहायला हवे.

 

सांगवी उमरची सीमा गावकऱ्यांनी केली बंद
तेलंगणातील बासवाडा, बोधन, निजामाबाद, हैदराबाद येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या सीमावर्ती भागातील नागरिक सतर्क झाले आहेत. बुधवारी (ता. आठ) याच पार्श्वभूमीवर सांगवी उमरच्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून या गावातून तेलंगणाला जाणाऱ्या रस्त्याची सीमा बंद करून या ठिकाणी खडा पहारा सुरू ठेवला आहे.

 

हेही वाचा - पाल्याच्या ‘यशा’त पालकांची भूमिका महत्त्वाची, कशी? ते वाचाच

नागराळ सीमेवरील वाहतूक मात्र सुरूच
नागराळ सीमेवरून तेलंगणा कर्नाटक व पुढे आंध्रातही जाता येते. प्रारंभी येथे मरखेल पोलिसांचे पथक गस्तीवर होते, कर्नाटकातील बिदर येथेही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कर्नाटक सीमेवरील गावातील नागरिकांत मात्र सध्या भीतीयुक्त वातावरण आहे. चोरटी वाहतूक रोखण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यात मोठे मोठे झाडे दगडे टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नही केला, मात्र नागरिक बाजूच्या शेतीतून व रस्त्यातील अडथळा बाजूला करून वाहतूक करीत असल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसून येत आहे. शेवटी शेजारील नागरिकांशी आमचे नेहमीचेच सौहार्दपूर्ण संबंध राहिल्याने आम्ही तरी त्यांना कुठपर्यंत निर्बंध लादू शकतो. यासाठी प्रशासन पातळीवरूनच कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचे मत गजानन पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने राज्य सीमा बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

बंदोबस्तासाठी संख्या अपुरी
पोलिस असो अथवा महसूल, अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता पूर्वीच कोरोनामुळे त्यांच्यावर बंदोबस्ताचा व नियोजनाचा मोठा ताण असताना नागरिकांनी स्वतःहून अशा पळवाटा शोधणाऱ्या परराज्यातील वाहतुकीवर निर्बंध आणायला हवेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers close the border with Telangana, nanded news