esakal | पाल्याच्या ‘यशा’त पालकांची भूमिका महत्त्वाची, कशी? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते. परंतु, वेळ नसल्याने पाल्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या काळात घरीच असल्याने पाल्याच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यास निश्‍चितच फायदा होईल. कारण पाल्याच्या यशात पालकांची भूमिका महत्त्वाची असते.

पाल्याच्या ‘यशा’त पालकांची भूमिका महत्त्वाची, कशी? ते वाचाच

sakal_logo
By
विश्वनाथ कहाळेकर

नांदेड : सध्या राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत जात असल्याचा आलेख दिसून येत आहे. वाढत्या लोकसंखेनुसार रोजगार उपलब्ध होत नसला तरी आपल्या आवडीनुसार काम मिळत नाही म्हणून अनेक जण विचारच करत बसत आहेत. तर काही ठिकाणी काम करण्यास माणूस मिळत नाही म्हणूनही अनेक व्यावसायिक त्रस्त आहेत. त्यामुळे आपल्या आवडीचा विचार न करता मिळेल त्या कामाला स्वीकारून यशाच्या दिशेने संघर्ष चालू ठेवल्यास यश मिळतेच, हे त्रिकालबाधित सत्य आहे. 

बुद्धिमत्ता विकास
मूल जन्माला येण्याअगोदरच आईच्या गर्भामध्ये त्याच्या सर्व शारीरिक अवयवांचा विकास होतो. त्यावेळी त्याच्या मेंदूचीही निर्मिती व विकास होत असतो. त्यावेळी अनुवंशिक गुणही त्याच्यामध्ये रुजतात. काही प्रमाणात शरीररचना, आवाज यात काहीसे साधर्म्य आपणाला दिसून येते. जन्माला आल्यानंतर कुटुंब, समाज, परिसरातील घटकांच्या अनुकरणातून त्याची बुद्धिमत्ता विकसित होत जाते. 

हेही वाचा - व्हॉटसअॅपद्वारेच विद्यार्थी घेतात अभ्यासाचे धडे

शालेय जीवन
मूल चालू- बोलू लागल्यानंतर त्याच्यावर ज्ञानाचे संस्कार (लिहिता-वाचता येण्यासाठी) टाकण्यासाठी आपण त्याला अंगणवाडी, बालवाडी, पहिली, दुसरी असे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या वर्गांमध्ये पाठवतो. यावेळी बालकाच्या आवडी- निवडी जर आपणाला ओळखता आल्या, तर निश्‍चितच त्याला परिणामकारक शिक्षण देऊन लवकर त्याला यश संपादन करण्यास मोलाचा वाटा उचलता येवू शकतो. 

हे देखील वाचाच - Video : वर्तमानपत्र वाचनाच्या भूकेकडून समाधानाकडे

पालकांची भूमिका
पालकांनी आपल्या पाल्यासोबत मित्रत्वाची भूमिका बजावायला हवी. त्यामुळे पाल्य मोकळेपणाने आपल्या पालकांशी संवाद साधू शकतो. आपल्या मनातील भावना, आवडी- निवडी शेअर करतो. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यातील उपजत कलागुण, भावना, त्याची विचार करण्याची शैली समजण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या पाल्याच्या आवडीनुसार, योग्य त्या दिशेने मार्गदर्शन करून त्यास यशाच्या शिखरापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणूनच पाल्याच्या जडणघडणीमध्ये पालकांचा मोठा वाटा असायला पाहिजे. 

लॉकडाउनमुळे पालकांना संधी
लॉकडाउनमुळे नेहमी कामात व्यस्त असलेल्या पालकांना आता विसावा मिळाला आहे. त्यामुळे ते आता आपापल्या कुटुंबासोबत दिवस-दिवस घालवत आहेत. तसेच आपल्या पाल्यासोबतही विविध खेळ खेळण्यात मग्न झाल्याचे चित्र आहे. या वातावरणात पालकांनी पाल्यासोबत मित्रभावनेने पाहिल्यास नक्कीच पाल्य पालकांसमोर खुलू शकतात. आणि त्यातून पालकांना आपल्या पाल्याच्या आवडी-निवडी, कला, छंद जाणून घेण्यास मदत होईल.
- शिवाजी कहाळेकर (शिक्षक, नांदेड)

loading image
go to top