esakal | वनराई जपण्यासाठी मोहळाई झाली शिस्तबद्ध 
sakal

बोलून बातमी शोधा

मोहळाई (ता. भोकरदन) : परिसरात ग्रामस्थांच्या शिस्तीमुळे जपली गेलेली वनराई. 

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) - वनराई जपण्यासाठी अवघे मोहळाई गाव शिस्तबद्ध झाले, यासाठी गावात अंतर्गत कायदे बनविण्यात आले, हे कायदे मोडणाऱ्यांवर आर्थिक दंडही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे वृक्षसंपदा कायम राहिली, वनराईत बागडणारे मोर, पक्ष्यांचा चिवचिवाट, हरणांचे कळप त्याची साक्ष देत आहेत. 

वनराई जपण्यासाठी मोहळाई झाली शिस्तबद्ध 

sakal_logo
By
प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) - भोकरदन तालुक्‍यातील मोहळाई येथील 70 एकर परिसरात वनीकरण लक्ष वेधून घेत आहे. ही वनराई जपण्यासाठी अवघे गाव शिस्तबद्ध झाले, यासाठी गावात अंतर्गत कायदे बनविण्यात आले, हे कायदे मोडणाऱ्यांवर आर्थिक दंडही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे ही वृक्षसंपदा कायम राहिली, वनराईत बागडणारे मोर, पक्ष्यांचा चिवचिवाट, हरणांचे कळप त्याची साक्ष देत आहेत. 

मोहळाईत वर्ष 1960 पूर्वी दंगली, मारामाऱ्या, खून असे गंभीर गुन्हे घडत होते. याची दक्षता घेऊन तत्कालीन पोलिस पाटील संतोष पालकर, नारायण पालकर, हनुमंता पालकर, पांडुरंग पालकर यांनी गावाच्या एकोप्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना एकत्र केले. गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. तेव्हापासून गावातील तंटे गावातच मोडले जात आहेत. येथे काही समाजहिताचे गाव कायदेही बनविले. ते पाळलेही जात आहेत. कायदे तोडणाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करून दंडाची रक्कम ही मारुती संस्थानकडे जमा केली जाते. याच कायद्यामुळे येथील वनीकरणही आज पूर्णपणे जिवंत आहे, हे विशेष.

गावात कुऱ्हाडबंदी 
येथे जवळपास 70 एकर सामाजिक वनीकरण आहे. पैकी 25 एकरांवर वर्ष 1988 मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. मोहळाई हे गाव वर्ष 1990 पूर्वी सावंगी अवघडराव ग्रुपग्रामपंचायतीशी संलग्न होते. 1989 ला हे वनीकरण मोहळाई गावाने ताब्यात घेतले. त्याआधीच 1960 मध्ये वनीकरणाविषयी कुऱ्हाडबंदीचा कायदा अमलात आहे. वनीकरणातील झाडे तोडल्यास, जनावरे चारल्यास दंड आकारण्यात येतो. आतापर्यंत जवळपास वीस हजारांवर दंड वसूलही करण्यात आला आहे. गाव विदर्भ सीमेवर आहे. जे कायदे मोडतील त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. 

पशुपक्ष्यांचे वास्तव्य 
गावच्या कायद्यामुळे वनराई अबाधित राहिली. आता या वनीकरणात विविध पक्ष्यांबरोबर काही जंगली प्राणीही वास्तव्य करीत आहेत. नाचणारे मोर पक्ष्यांचा चिवचिवाट, हरणांचे धावणारे कळप असे मोहक दृश्‍य येथे दिसते. वनराईमुळे येथे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. दरवर्षी या वनीकरणाचा गुरे चराईसाठी लिलाव केली जातो व येणारा पैसा विकासासाठी वापरला जातो. यातही गुरे चारताना झाडांचे नुकसान झाल्यास दंड आकारण्यात येतो. वनीकरणाला लागून तलाव असून, याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी होतो. 

येथील जवळपास 45 एकर जमीन ही मोकळी असून या जागेवरही लवकर वृक्षलागवडीची आवश्‍यकता आहे. नसता अतिक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. येथे वृक्षलागवडीसाठी जमीन मोकळी असल्याने वाद वाढत आहेत. त्यासाठी शासनाने त्वरित वृक्षलागवडीसाठी सहकार्य करावे; तसेच तलावाचे क्षेत्र लहान असून यामुळे सिंचन क्षेत्र अविकसित आहे. शासनाने येथील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मदत करावी. 
- सांडू पालकर 
सरपंच, मोहळाई 
------- 
मोहळाई गावात गुन्हे घडतात; मात्र येथे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज पडत नाही. शक्‍यतो वाद-विवादाचे प्रकरण समोपचाराने गावातच मिटविले जातात. याची गावपातळीवर नोंद घेतली जाते. यावर्षी पोलिसांत गेलेली 65 प्रकरणे गावातच मिटविण्यात आली आहेत. 
- सुरेश पालकर 
पोलिस पाटील, मोहळाई 

loading image
go to top