esakal | चारित्र्यहिन म्हणत अत्याचार पीडित महिलेला गावाने नाकारला प्रवेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

पाच वर्षांपूर्वी एका महिलेवर गावातीलच चार जणांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने या प्रकरणातील चारही आरोपींना गतवर्षी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.

चारित्र्यहिन म्हणत अत्याचार पीडित महिलेला गावाने नाकारला प्रवेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

sakal_logo
By
वैजीनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) : पाच वर्षांपूर्वी एका महिलेवर गावातीलच चार जणांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने या प्रकरणातील चारही आरोपींना गतवर्षी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेला चारित्र्यहिन व व्याभिचारी म्हणत सदरील महिलेविरोधात तीन ग्रामपंचायतीने चक्क गावातून हद्दपार करण्याचा ठराव घेतला. एवढ्यावरच न थांबता ती चारित्र्यहिन व व्याभिचारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तिच्याविरोधात अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे समोर आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, ता.१ जानेवारी २०१५ रोजी एक तीस वर्षीय महिला पाचेगाव येथील आपल्या शेतातील कापूस वेचणीचे काम उरकून सायंकाळी उशिरा बीडकडे निघाली होती. याचवेळी एक खासगी जीपचालकाने तिला गाडीत टाकून अन्य तीन साथीदारांसोबत एरंडगाव शिवारात तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी गतवर्षी बीड जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील चार आरोपींनी संगनमत करुन महिलेवर अत्याचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान याचाच राग मनात धरून गावातील लोकांनी संगनमत करून या महिलेला गावातून हाकलून देण्याकरीता पाचेगाव, वसंतनगर तांडा व जयराम नाईक तांडा या ग्रामपंचायतीने ता.१५ आॅगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन सदरील महिलेवर चारित्र्यहीन व व्याभिचारी असल्याचा आरोप करत गावातून हद्दपारीचा संतापजनक ठराव घेतला. दरम्यान सोमवारी पाचेगाव येथील ग्रामस्थ, महिला यांनी बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन या महिलेविरोधात निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

सदरील प्रकरणी पीडित महिलेची पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी महिलेने टाहो फोडला. तर ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक यांच्यासमोर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत सदरील महिलेपासून गावाला धोका असल्याचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे. दरम्यान महिलेविरोधात घेण्यात आलेल्या ठरावावर ग्रामसेवक, सरपंच यांची सही असल्याने हा विषय अतिशय गंभीर झाला असून एका महिलेला चारित्र्यहिन ठरवत गावातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तीन ही ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला
तीन ही ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला आहेत. महिलेपासून धोका असल्याचे निवेदन सदरील महिलेला पाचेगाव, वसंतनगर तांडा व जयराम नाईक तांडा या ग्रामपंचायतीने ठराव घेऊन गावातून हद्दपार करुन तिला चारित्र्यहिन व व्याभिचारी म्हटले आहे. या तिनही ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला आहेत. तर सदरील महिलेपासून गावातील नागरिकांना धोका आहे. तिची वागणूक समाजमान्य नाही. तिने यापूर्वी देखील अनेकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. नेहमीच विनयभंग, बलात्काराचे आरोप करुन नागरिकांना धमक्या देत असल्याने गावात भितीचे वातावरण आहे. तरी या महिलेची कोणतीही फिर्याद गावात शहानिशा केल्याशिवाय घेऊ नये असे निवेदन ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image