esakal | कोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

korona.jpg

शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे. यात पुणे येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ दक्ष आहेत. आता तर पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही दिले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

कोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना

sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली) : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे. डिग्रस (ता. कळमनुरी) येथे तर पुणे येथून आलेल्या सूर्यवंशी कुटुंबीयांना गावकऱ्यांनी पाणी देण्यासही नकार दिला. त्यामुळे पाण्याअभावी चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, केंद्रप्रमुख बालाजी गोरे, तलाठी व ग्रामसेवकांनी गावाला भेट देऊन पाणीप्रश्न सोडविण्यास मदत केली.

दिग्रस (ता. कळमनुरी) येथील अंतोष सूर्यवंशी यांची बहीण दुर्गा वाकळे व भावजी भगवान वाकळे हे मुळशी (जि. पुणे) येथे कामानिमित्त राहतात. महिन्यापूर्वी श्रीमती दुर्गा वाकळे यांची प्रसूती झाली. त्यानंतर श्रीमती वाकळे व त्यांच्या आई उज्ज्वला सूर्यवंशी या गुरुवारी (ता. १४) सकाळी डिग्रस येथे आल्या. 

हेही वाचाहिंगोलीत विभागीय पथकाने घेतला उपाययोजनांचा आढावा

पाणी घेण्यास मज्जाव

त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना विलगीकरण कक्षात थांबण्यास सांगितले. मात्र, नेमके थांबावे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्यानंतर बालाजी सूर्यवंशी यांनी त्यांना घरी नेले. घरी जाताना त्यांनी एका हात पंपावरून पाणी भरून घेतले. मात्र, शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी त्यांना हातपंपावरून पाणी घेण्यास मज्जाव केला. 

महसूलच्या कर्मचाऱ्यांची धाव

त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबीय अडचणीत सापडले. सकाळपासून पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे श्री. सूर्यवंशी कुटुंबीय व त्यांची बहीण दुर्गा वाकळे यांचे चांगलेच हाल झाले. गावकरी पाणी भरू देत नसल्याने श्री. सूर्यवंशी यांनी आखाडा बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी देविदास गायकवाड यांना गावात पाठविले. 

हातपंप दुरुस्त करून देण्यात आला

श्री. गायकवाड यांनी गावात पाहणी केल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दोन हंडे पाणी देण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी तातडीने गावात भेट दिली. त्यानी गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर श्री. सूर्यवंशी कुटुंबीयांसाठी परिसरातील हातपंप दुरुस्त करून देण्यात आला असून त्यांना पाणी देण्यात आले. दरम्यान, डिग्रस येथील सरपंचाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

येथे क्लिक कराजाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना

केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांनी सोडविला पाणीप्रश्न

केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांचे डिग्रस हे गाव आहे. आपल्या गावामध्ये हा प्रकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. गोरे यांनी आखाडा बाळापूर येथून दोन कॅनमध्ये पाणी भरून घेतले. तसेच कुरुंदा येथील मित्रालाही दोन कॅन भरून पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर हे पाणी श्री. सूर्यवंशी कुटुंबाला देण्यात आले. श्री. गोरे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली. त्यानंतर श्री सूर्यवंशी कुटुंबीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.