नांदेडकरांना रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

शिवचरण वावळे
Monday, 27 April 2020

नांदेड महापालिका हद्दीत रविवारी (ता.२६) अबचलनगर भागात एका ४४ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती नांदेडहून दिल्ली येथे प्रवाशांना सोडण्यासाठी गेली होती.

नांदेड : नांदेड शहरात आढळलेल्या दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील १६ संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल कसा येणार? याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

नांदेड महापालिका हद्दीत रविवारी (ता.२६) अबचलनगर भागात एका ४४ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती नांदेडहून दिल्ली येथे प्रवाशांना सोडण्यासाठी गेली होती. त्यानंतर नांदेडला परत आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घशातील स्वॅबचे नमुने चाचणीसाठी घेऊन त्यांना यात्री निवास येथे क्वॉरंनटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी (ता.२६) रात्री उशीराने त्यांचा अहवाल प्राप्त झाला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची विशेष बैठक घेऊन अबचलनगर परीसर सील करण्यात आला.
 
हेही वाचा- विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी घेतली ‘लॅब’ची धसकी, कशामुळे? ते वाचाच

रुग्णाच्या संपर्कातील १६ व्यक्तींचा अहवाल प्रतिक्षेत

सोमवारी सकाळी (ता.२७) त्या संपूर्ण परीसराची सॅनिटायझरने फवारणी करुन परीसर निर्जंतुकिकरण केला. जिल्हा प्रशासन इतक्यावरच न थांबता ‘कोरोना’ बांधित रुग्णाच्या संपर्कातील व परिवारातील १६ व्यक्तींचा संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी घेऊन ते स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

अबचलनगर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित

यापूर्वी बुधवारी (ता.२२ ) पीरबुऱ्हाणनगर भागात जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळुन आला होता. त्यानंतर प्रशासनाने या भागात २५० आरोग्य पथकाची स्थापना करुन त्याद्वारे पहिल्याच दिवशी दहा हजार नागरीकांचे थर्मल मशीनद्वारे स्क्रिनिंग करण्यात आली होती. अबचलनगर भागात देखील ‘कंटेनमेंट झोन’ घोषित करुन परीसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घातली आहेत. 

हेही वाचा- लग्नासाठी आनंदाने गावी आलेले नवरोबा हिरमुसले, कसे? ते वाचाच

एक रुग्ण स्थिर एक गंभीर

सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत एक हजार १५ संशयितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत ७३७ स्वॅब घेण्यात आले होते. त्या पैकी केवळ दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ६७७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ५३ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरु असून, पहिल्या कोरोना बाधीत रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा असे आजार आहेत. नव्याने दाखल केलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the report of 16 people in contact with the patient to Nandedkar