PRB20A02670
PRB20A02670

मास्क न घालता फिरताय, मग असा होइल सत्कार... 

परभणी ः शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आता परभणी योद्ध्यांनी गांधीगिरी सुरू केली आहे. गुरुवारी (ता.१७) दोनशे जणांचा मास्क लावून व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

शहरात हातगाडेवाले, दुधवाले, किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यासह नागरिक देखील खुलेआम फिरत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. महापालिकेने तर कंटाळून व विरोध होत असल्याने कारवाई देखील थांबवल्याचे दिसून येते. पोलिस प्रशासन अधूनमधून कारवाई करते. तरी देखील नियमांची पायपल्ली करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. म्हणून की काय परभणी योद्ध्यांनी आता मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. 

अनेकजण कावरेबावरे
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने विविध रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी थांबून मास्क न घालता फिरणारे दिसून आल्यास त्यांना थांबवून त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला जातो. नंतर मास्क दिले जाते व विनामास्क फिरण्याच्या परिणामाची जाणीव करून दिली. गर्दीत, सर्वासमक्ष ही गांधीगिरी होत असल्यामुळे सत्कारमूर्ती कावरेबावरे होत असल्याचे दिसून येते. तर काहीजण अरेरावीची भाषादेखील करीत आहेत. परंतु, त्यांना दंडाचा धाक दाखवताच सत्काराला तयार होत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अनेक सरकारी, महापालिकेचे कर्मचारीदेखील आहेत. त्यांचादेखील परभणी योद्ध्यांनी सत्कार केला. आमदार डॉ. राहुल पाटील मित्रमंडळाचे गौरव तपके यांच्यावतीने परभणी योद्धा पथकाचे प्रमुख सुशील देखमुख, श्री. दळवे, विजय तिवारी आदींनी पुढाकार घेतला. 
 
हेही वाचा - परभणीत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आयसीयू हॉस्पिटल- नवाब मलिक

महापालिकेच्या कोरोना योद्ध्यासह परभणी योद्ध्यांचा गौरव 
परभणी ः कोरोना संसर्गात प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या महापालिकेतील कोरोना योद्ध्यांचा पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१७) सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रवीण रेंगे, दीपक कानोडे, युसूफजाई मुक्तसीद खान, गजानन जाधव, करण गायकवाड, विकास रत्नपारखे, विनय ठाकूर, भीमराव जगताप, देविदास धापसे, सोनाली पाचघरे, एम.एस.सॅम्युअल यांच्यासह परभणी योद्धा सुशीलकुमार देशमुख, तुळशीराम दळवे, लक्ष्मीकांत गाडेकर, विजय गारकर, विजयकुमार तिवारी, महेश पाटील, दीपक टाक आदींचा पालकमंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर अनिता सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी ऊर्फ माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, चाँद सुभाना जाकेर खान, सौ.मंगलताई मुद्गलकर, चंद्रकांत शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. 

महापालिकेच्या होम आयसोलेशनबाबत मार्गदर्शन सूचना जारी 
परभणी ः कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आता घरातच ठेवण्यात येणार असून महापालिकेने होम आयसोलेशनबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोना प्रसाराच्या काळात पालिका आपल्यासोबत असून नागरिकांनी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे यांनी केले. महापालिकेने जर व्यवस्था असेल तर बाधित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या घरातच विलगीकरण, अलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. रुग्ण व कुटुंबीय घरी असले तरी पालिकेचा आरोग्य विभाग थेट त्यांच्या संपर्कात विविध बाबींबर मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शक पुस्तिकेच्या माध्यमातून बाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी कुठली खबरदारी घ्यावी, कुठला आहार घ्यावा, कोणती व केव्हा औषधी घ्यावीत आदी माहिती दिली आहे. ८० टक्क्यांहून जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरी राहून सहज बरे होऊ शकतात. या पुस्तिकेत होम आयसोलेशन यामध्ये भौतिक सुविधा, घरातील व्यक्ती, त्यांचे आजार याविषयी माहिती घेऊन पालिका निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर रुग्णांसाठी खबरदारीच्या सूचना, काळजी घेणाऱ्यांसाठी, परिचारिकांसाठी सूचना, स्वयंदेखरेख, वैद्यकीय मदत कशी घ्यावी, पोषण मार्गदर्शिका आयुष आयुर्वेदिक पद्धती, रोगमुक्ती प्रक्रिया, चाचण्या व दैनंदिन ट्रॅकर, होम आयसोलेशन किट, संपर्क क्रमांक आदींची माहिती देण्यात आली. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com