सावधान: फ्रन्ट लाईनवरील यौद्ध्यांनाच कोरोना- नांदेडकरांमध्ये भितीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

फ्रन्ट लाईनवर लढणाऱ्या कोरोना यौद्ध्यांनाच या विषाणूचा फटका बसत आहे. राजकिय पक्षाच्या नेत्यांसह पोलिस, आरोग्य, महावितरण, स्वच्छता, बँक आदी खात्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने नांदेडकर भितीच्या सावटाखाली आहेत. 

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आजघडीला ३०० पर्यंत कोरोना बाधीतांची संख्या पोहचली आहे. विशेष म्हणजे फ्रन्ट लाईनवर लढणाऱ्या कोरोना यौद्ध्यांनाच या विषाणूचा फटका बसत आहे. राजकिय पक्षाच्या नेत्यांसह पोलिस, आरोग्य, महावितरण, स्वच्छता, बँक आदी खात्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने नांदेडकर भितीच्या सावटाखाली आहेत. 

कोरोना या विषाणूने संबंध जगाला त्रस्त करुन सोडले आहे. या आजारामुळे जगातील महासत्तासुद्धा हतबल झाल्या आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी लॉकडाऊन सरू आहे. पहिला, दुसरा व तिसरा लॉकडाउन कडक पाळण्यात आला. त्यादरम्यान कोरोना बाधीतांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये या संख्येचा स्फोट झाला. लाखोंचा या आजारामुळे बळी गेला असून लाखों नागरिकांना याची बाधा झाली आहे. बऱ्याचअंशी काही प्रमाणात या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

हेही वाचा इस्लापूरच्या सहाय्यक फौजदारावर लाचेचा गुन्हा

नांदेडसह ग्रामिण भागातही कोरोनाचा शिरकाव

नांदेड शहरातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण हा पिरबुऱ्हानगर भागात ता. २२ एप्रील रोजी सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून हा परिसरात कंटेनमेन्ट झोन जाहीर केला होता. त्यानंतर नांदेडकर काही प्रमाणात घाबरले होते. मात्र हळूहळू कोरोना बाधीतांचा आकडा वाढत गेला. शहरासह कोरोनाने आपले पाय ग्रामिण भागातही पसरले. माहूर, किनवट, मुदखेड, भोकर, उमरी, देगलूर, मुखेड, अर्धापूर यासह आदी तालुक्यात कोरोना बाधीतांचे रुग्ण आढळले. एवढेच नाही तर जिल्ह्यातील बळींची संख्या ही १३ वर पोहचली आहे. 

कोरोना योद्धेच बाधीत, नांदेडकर भयभीत

कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी फ्रन्टलाईनवर लढणारे व आपले कर्तव्य पार पाडणारे पोलिस, महसुल, बँक, महावितरण, आरोग्‍य, स्वच्छता यासह आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी मागील तीन महिण्यापासून सतत या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर आहेत. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आवाहन करत कामाशिवाय घराबाहेर पडू नका, तोंडाला मास्क बांधा, सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ पाण्याने धुण्यासाठी सांगत आहे. मात्र हेच कोरोना यौद्धे आता या आजाराला बळी पडत आहेत. जिल्ह्यातील पोलिस, आरोग्य, स्वच्छता, बँक, महावितरण आदी विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. फ्रन्टलाईनवर लढणारेच या आजाराल बळी पडत असल्याने नांदेडकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning: Fear in Corona-Nandedkar only to the front line warriors nanded news