इस्लापूरच्या सहाय्यक फौजदारावर लाचेचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून इस्लापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

नांदेड : दाखल गुन्ह्यात व तपासात मदत करतो असे म्हणून लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरिक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून इस्लापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

इस्लापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आष्टी (ता. हदगाव) येथील केशव मंगु जाधव हे सध्या इस्लापूर पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होता. या पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या काका व चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाकल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार केशव जाधव याच्याकडे दिला होता. केशव जाधव याने याने तक्रारदाराच्या काका व चुलत भावास जामीन मिळवून देतो तसेच तपासात पुढे मदत करतो असे म्हणून २० हजाराची लाच मागितली. मात्र तडजोडअंती ही लाच सहा हजार रुपये देण्याचे ठरले. 

हेही वाचा -  धक्कादायक : देहविक्रीसाठी मुलींना पळविणारी टोळी जेरबंद

सहा हजाराची लाचेची मागणी

मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन ता. १६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधकचे पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांनी लाच मागणी पडताळणी सापळा लावला. ता. १७ जून रोजी सरकारी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये लोकसेवक केशव मंगू जाधव याने २० हजारापैकी तडजोडीत ठरलेली सहा हजार रुपये रक्कम घेण्याचे निष्पन्न झाले.

इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा 

यावरून पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन सहाय्यक फौजदार केशव मंगु जाधवविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत.

येथे क्लिक करा - कोरोना अपडेट - नांदेडला गुरूवारी सापडले दहा रुग्ण

नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक- १०६४, नांदेड कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२- २५३५१२ किंवा पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांचा चलभाष क्रमांक ८९७५७६९९१८ वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crime of bribery against a corrupt assistant police sub inspector nanded news