रुग्णालय बंद ठेवल्यास ताकीद अन् सुरू ठेवण्यास पासची अडवणूक, खासगी डॉक्टर दुहेरी संकटात  

शिवचरण वावळे
Thursday, 23 April 2020

जर खासगी डॉक्टरांना रुग्णालय सुरु ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पास दिल्या जात नसतील तर, खासगी डॉक्टरांनी रुग्णालय तरी का आणि कुणाच्या जिवावर उघडे ठेवावे, कुणाला मरणाच्या दारात जाण्याचा शौक आला असा सवाल आयएमए संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सरेश कदम यांनी उपस्थित केले आहे.

नांदेड : ‘कोरोना’ काळात खासगी रुग्णालय बंद राहिल्यास किंवा सेवा देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीत यापूर्वीच आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेला दिली आहे. ‘कोरोना’ काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. अशात जर खासगी डॉक्टरांना रुग्णालय सुरु ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पास दिल्या जात नसतील तर, खासगी डॉक्टरांनी रुग्णालय तरी का आणि कुणाच्या जिवावर उघडे ठेवावे, कुणाला मरणाच्या दारात जाण्याचा शौक आला असा सवाल आयएमए संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सरेश कदम यांनी उपस्थित केले आहे. 

लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. या दरम्‍यान रुग्णालयात किंवा औषधी दुकानावर ये-जा करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांच्यामार्फत पासेस दिल्या जात आहेत. परंतु, ह्या पासेस मिळविण्यापूर्वी त्यांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन यांच्याकडून लेखी स्वरुपात पासेसची मागणी करावी लागत आहे. त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाद्वारे ह्या पासेस देण्यात येत आहेत. 

हेही वाचा - ‘या’ सोसायटीने स्वयंस्फुर्तीने ठेवला नांदेडकरांसमोर ‘आदर्श’, कसा ते वाचाच...

डॉक्टर चांगलेच वैतागले​

खासगी डॉक्टरांना हव्या तेवढ्या पासेस मिळत नसल्याने खासगी डॉक्टारांची निराशा होत आहे. पुरेशा पासेस देण्यात याव्यात यासाठी त्यांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करावी लागत आहे. तरी देखील त्यांची मागणी मान्य होत नसल्याने खासगी डॉक्टर चांगलेच वैतागले आहेत. 

हेही वाचा -  दुर्देव : कोरोनाच्या लढाईत नर्स-आशा वर्करची फरफट

किमान २० ते २५ पासेसची मागणी​

मानवाधिकार कायद्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून आठ तासाच्यावर काम करून घेता येत नाही. तरी देखील कर्मचारी कमी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आठ तासापेक्षा जास्त काम करणे भाग पडत आहे. खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी व्हावा यासाठी किमान २० ते २५ पासेसची मागणी केली जात आहे. परंतु, त्यांना हव्या तेवढ्या पास दिल्या जात नसल्याने खासगी डॉक्टरदेखील वैतागले आहेत.

 

केस होण्याची भीती वाटते

वीस खोल्यांचे रुग्णालयास किमान तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. या दरम्यान रुग्णालयासाठी तज्ज्ञ डॉक्टर, तीन वार्डबॉय, तीन ते चार नर्स, ब्रदर्स यांच्यासाठी पासेस हव्या असतात. यासाठी मी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी इतकेच नव्हे तर उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांच्याकडे संघटनेच्या लेटर पॅडवर लेखी विनंती करुन पासेसची मागणी केली. तरी हव्या तेवढ्या पासेस मिळत नाहीत. खासगी रुग्णालयात मनुष्यबळ नसल्यास रुग्णालय उघडे ठेवून उपयोग होणार नाही. अजुनही मी त्यांच्याकडे गेल्यास माझ्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरुन केस होण्याची भीती वाटते. 
- डॉ. सुरेश कदम, जिल्हाध्यक्ष, आयएमए संघटना नांदेड.

 

डॉक्टर्सना पास दिल्या जात आहेत
आत्तापर्यंत किती पासेस दिल्या याबद्दल आम्हाला माहिती देण्याचा अधिकारी नाही. ती माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपणास मिळेल. परंतु, आम्हाला वाटले त्याप्रमाणे डॉक्टर्सना पास दिल्या जात आहेत.

- लतिफ पठाण, उप विभागीय अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning If The Hospital Is Closed, Obstruction Of Pass To Continue Private Doctor In Double Trouble Nanded News