...अन् असा केला मित्राचा विश्वासघात

file photo
file photo

जिंतूर (जि.परभणी) : वरुड (नृसिंह) रस्त्यावरील संतोबा मंदिराजवळ मंगळवारी (ता. तीन) तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. यातील फरार आरोपीला पोलिस पथकाने मंठा (जि. जालना) येथून अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. त्यास बुधवारी (ता.चार) पोलिसांनी न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

जिंतूर शहरातील कराटे अकॅडमी चालक संतोष सखाराम जाधव हा अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचे कराटे प्रशिक्षणाचे वर्ग घेत आहे. या क्लासच्या माध्यमातूनच त्याचा संभाजीनगरातील योगेश मल्हारी राऊत सोबत संपर्क आला. राऊतने त्याच्याकडेच कराटेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कराटे क्लास उघडण्याचा मनोदय व्यक्त केल्याने या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. 


मला तुला काही बोलायचे....
दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास योगेश राऊत त्याच्या गॅस शेगडी रिपेअरिंगच्या दुकानात काम करत असताना संतोष जाधव या ठिकाणी येऊन योगेश राऊतला ‘मला तुला काही बोलायचे आहे’, असे म्हणून स्वतःची दुचाकी योगेशच्या दुकानी ठेवून योगेशच्या दुचाकीवर (एमएच २२ - एटी ४७२२) बसून दोघेजण वरुड रस्त्यावरील संतोबा मंदिराजवळ गेले. त्या ठिकाणी एकांतात बोलून परत शहराकडे येत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. चालत्या दुचाकीवरच संतोषने योगेश राऊतच्या पोटात स्वतःजवळील चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी अवस्थेत योगेश गुरुकुल आश्रमापर्यंत पळत आला व तिथे असलेल्या नागरिकांना या बाबत माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली. इकडे संतोष जाधव हल्ला करतात शेतातून पलायन करत अकोलीपर्यंत गेला, तेथून एका वाहनाने मंठा गाठले.

अवघ्या पाच तासांत घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तीन पथके तयार करून आरोपीच्या शोधार्थ पाठविले. सहायक पोलिस निरीक्षक शिवसांभ स्वामी, शंकर हाके, राम पौळ, नामदेव डुबे, गजानन क्षीरसागर, सय्यद असगर, सिद्धेश्वर चाटे यांचे पथक मंठा येथे त्याचा शोध घेत असताना तो घरात लपून बसलेला आढळून आला. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सदर प्रकरणी तुकाराम विठ्ठल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष जाधव याच्या विरुद्ध खुनाच्या आरोपावरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com