पोलिसांना मिळेना पाणी, औरंगाबादेत असे का होतेय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पोलिस आयुक्तालयाशेजारी पोलिसांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, 750 घरांना अद्याप पाणीच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. महापौरांच्या आदेशानंतर तरी पोलिस आयुक्तालयातील नव्या 750 घरांना पाणी मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयाशेजारी पोलिसांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, 750 घरांना अद्याप पाणीच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या घरांसाठी नळ मिळावेत म्हणून सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी (ता. 15) थेट महापालिकेत धाव घेतली. महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन त्यांनी पाण्याची मागणी केली. त्यावर तातडीने नळ कनेक्‍शन देण्याचे आदेश महापौरांनी दिले. 

पोलिसांसाठी घरे बांधण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली होती. त्यातून पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात बहुमजली घरे बांधण्यात आली. यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. या ठिकाणी 750 घरे बांधण्यात आली आहेत. त्यात पोलिस कर्मचारी कुटुंबासह राहण्यास गेले. मात्र पाण्याची सुविधा नसल्यामुळे त्यांना भटकंती करावी लागत आहे.

क्लिक करा - बायको छळते? इथे मिळेल पहा आधार

महापालिकेने एकच नळ कनेक्‍शन दिले असून, हे पाणी एवढ्या मोठ्या वसाहतीसाठी पुरत नाही. त्यामुळे नवीन नळ कनेक्‍शन मिळावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात होता. नेहमीप्रमाणे महापालिका अधिकारी दखल घेण्यास तयार नसल्याने अखेर सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी महापालिका कार्यालय गाठले. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन नळ कनेक्‍शन देण्याची मागणी केली.

हेही वाचा - सिग्नल तुटले, पोलिसांनी वाहन थांबवले, अन्...

महापौर घोडेले यांनी दखल घेत तत्काळ नळ देण्याचे आदेश प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांना दिले. महापौरांच्या आदेशानंतर तरी पोलिस आयुक्तालयातील नव्या 750 घरांना पाणी मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Crisis in Police Quarters in Aurangabad