esakal | कळमनुरी तालुक्यातील तीन कोटी १३ लाख रुपयांचा पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एकशे पंचवीस गावात १४ नवीन विहीर घेण्याकरिता ८९ लाख २८ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील तीन कोटी १३ लाख रुपयांचा पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार 

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील काही गावात निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता प्रशासनाने तीन कोटी १३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात सर्वत्र चांगले पर्जन्यमान राहिल्यामुळे अनेक गावांमधून उन्हाळ्याच्या झळा थोड्या उशिराने जाणवू लागल्या आहेत काही गावांमधून निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता प्रशासनाने तीन कोटी १३ लाख रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करुन मंजूर केला आहे. यामध्ये तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, खाजगी विहीर अधिग्रहण करणे, सहा गावांमधून टँकरने पाणीपुरवठा करणे इत्यादी उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नांदेड विभाग मुंबई मध्य रेल्वे विभागाला जोडा- खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

तात्पुरती पूरक नळ योजना मध्ये असोला, म्हैसगव्हाण, बिगगव्हाण, बेलमंडळ, चींचोर्डी, महालिंगी तांडा, दिग्रस तर्फे कोंढुर, देवजना, गुंडलवाडी, घोडा ,कळमकोंडा खुर्द, कांडली, कडपदेव, कोंढुर, पुयना, धारधावंडा, रामेश्वर तांडा, रुद्र वाडी, सांडस, सिंदगी, तरोडा, तेलंगवाडी, वारंगा मसाई, या गावांमधून एक कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. नळ योजना विशेष दुरुस्तीमध्ये दोन गावे घेण्यात आली आहे. यामध्ये २५ गाव मोरवाडी नवीन योजना वीस लाख रुपये तर पोतरा येथील नळयोजना दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

एकशे पंचवीस गावात १४ नवीन विहीर घेण्याकरिता ८९ लाख २८ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. नवीन विंधन विहिरी घेण्याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाकडून जागा पाहणीचे काम ही हाती घेण्यात आले आहे. एप्रिल महिन्यामध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता ७६ गावात ९८ ठिकाणी विंधन विहीर, विहीर अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. याकरिता ५२ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तर बीबगव्हाण, महालिंगी तांडा, खापरखेडा, माळधावंडा, रामवाडी, हातमाली, या सहा गावात एप्रिल ते जून या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे याकरिता बारा लाख ६० हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. एकंदरीत प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना असलेला कृती आराखडा मंजूर केला असून पाणी टंचाई असणाऱ्या गावात वेळेवर सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी झाल्यास पाणी टंचाई असणाऱ्या गावामधील गावकऱ्यांना उपयोग होणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image