तीनशे लिटर पाण्यावर काढावा लागतो आठवडा

सुभाष बिडे 
सोमवार, 22 एप्रिल 2019

जनावरांचे हाल
परिसरात जनावरांसाठी चारा छावण्या नाहीत. चारा-पाण्याअभावी जनावंराचे हाल होत आहेत. काहींनी जनावरे विक्रीस काढली आहेत. दुसरीकडे जनावरांच्या किमती पडल्या आहेत. पन्नास हजारांच्या जनावराची वीस हजारांत मागणी होते, असे काही शेतकरी सांगतात.

घनसावंगी - पाणीटंचाईने जालना जिल्ह्यातील अनेक गावांची होरपळ सुरू आहे. त्यात गुरुपिंपरी (ता. घनसावंगी) या गावाचा समावेश आहे. या गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ते पुरेसे नाही. पाण्याअभावी गावातील शंभर हेक्‍टरवरील फळबागा संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. या गावांतील अनेकांनी रोजगारासाठी पुणे, मुंबई गाठले आहे.

गुरुपिंपरी हे तीन हजार लोकवस्तीचे गाव. पाणीपुरवठ्यासाठी शिंदेवडगाव रोड भागात सार्वजनिक विहिरी आहे. यंदा विहिरीची पाणीपातळी घटली. दोन-तीन दिवसांआड अर्धा तास वीजपंप चालविल्यास केवळ दोन हजार लिटर पाणी मिळते. त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सोय होते. ग्रामस्थांसाठी टॅंकर सुरू करण्यात आला आहे. एका टॅकरच्या नियमित दोन फेऱ्या होतात. त्यातच खंडित वीज, टायर पंक्‍चर, पाणी भरण्यास लागणारा वेळ लागणे आदी प्रकार घडतात. त्यावर मात करण्यासाठी गल्ली गल्लीत ड्रम ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरासाठी तीनशे लिटर पाणी देण्यात येते. त्यासाठी ग्रामपंचायतीचा कर्मचारी नियुक्त आहे. 

प्रत्येक घराला पाणीपुरवठा करेपर्यंत पुन्हा क्रमांक लागण्यासाठी आठवडा उजाडतो. त्यामुळे तीनशे लिटर पाण्यावर आठवडा कसा काढावा हा प्रश्‍न गावकऱ्यासमोर आहे. शेतात विहीर असलेले बैलगाडी किंवा भटकंती करून पाणी मिळवतात. दरम्यान, २०१२ च्या दुष्काळात २४ हजार लिटरचा टॅंकर येत होता. यावेळी १२ हजार लिटरचा येत आहे. त्यामुळेही टंचाई गंभीर झाली आहे. 

फळबागांवर जेसीबी
काही शेतकरी तीर्थपुरी परिसरातून टॅंकरने पाणी आणून फळबागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर ते मोठा खर्च करीत आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी सुमारे शंभर हेक्‍टरवरील फळबागा वाया गेल्या आहेत. काही शेतकरी त्या जेसीबीद्वारे तोडत आहेत. काही उत्पन्न न मिळताही, जेसीबीवरही मोठा खर्च करावा लागतो. या भागात मोसबीचे सर्वेक्षण झालेले नाही. शासकीय अनुदानाचाही पत्ता नाही, असे काही शेतकरी सांगतात.

मोसंबीची बाग वर्ष २०१२ च्या दुष्काळातही यशस्वीरीत्या जपली होती. उत्पन्नच हाती न आल्याने यंदा टॅंकरने पाणी देण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे दोनशे झाडांची बाग तोडावी लागत आहे. 
- पाराजी कोल्हे, शेतकरी 

ग्रामपंचायतीने २५ हजार लिटरच्या टॅंकरची मागणी केली होती. मात्र १२ हजार लिटरचे टॅंकर मिळाले. प्रशासनाने मोठा टॅंकर द्यावा.
- अनिल कोल्हे, उपसरपंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Animal Fodder Agriculture Loss