सिडकोत तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

पाणीपुरवठ्याचा सोमवारी (ता. १३) आढावा घेतला. त्यात शहरातील सर्व भागांना समान पाणी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
- नंदकुमार घोडेले, महापौर

औरंगाबाद- शहरात समान पाणीवाटप करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू आहेत; मात्र प्रशासन त्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कुठे आठ दिवसांआड पाणी येते, तर कुठे रोज पाणी मिळते, अशा तक्रारी अद्याप सुरूच आहेत; मात्र आता पाणीटंचाईच्या विषयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लक्ष घालून संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सिडको एन- पाच येथून सोमवारपासून (ता. १३) अंमलबजावणी सुरू करण्यात आली, तर एन- सात येथील टाकीवरून दोन दिवसांत नियोजन केले जाणार आहे.

उन्हाळा सुरू झाल्यापासून सिडको-हडकोतील पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत तब्बल आठ दिवसांआड पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे वारंवार आंदोलनेही केली जात आहेत. सिडको-हडकोत ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र तीन दिवसांआड पाणी दिले जात आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून समान पाणीपुरवठा करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली; मात्र प्रशासन अपयशी ठरले. दरम्यान, समान पाणीवाटपासाठी नगरसेवकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गळ घातली आहे. त्यामुळे प्रशासनाने एन- पाच पाण्याच्या टाकीवरून समान पाणीवाटपास प्रारंभ केला आहे. 

चार एमएलडी पाणी वाढल्याचा पुन्हा दावा  
जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर महापालिकेचा पाणी उपसा २० टक्‍क्‍यांनी घटला होता. पाणी वाढविण्यासाठी काही दुरुस्त्या जलतज्ज्ञ राजेंद्र होलानी यांनी सुचविल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाने त्यानुसार काम केल्याने चार एमएलडीने कमी झालेले पाणी वाढले आहे, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे; तसेच रविवारी फारोळाजवळ ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनला गळती लागली होती. दुरुस्ती केल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Supply Drought Sidko