मांजरा धरणातील पाणीसाठा ४६ टक्क्यांवर

हरी तुगावकर
Thursday, 24 September 2020

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात गेल्या २३ दिवसांत या धरणात शंभर दशलक्ष घनमीटर पाणी वाढल्याने एकूण पाणीसाठा १०५.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४६ टक्के झाला.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात गेल्या २३ दिवसांत या धरणात शंभर दशलक्ष घनमीटर पाणी वाढल्याने एकूण पाणीसाठा १०५.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४६ टक्के झाला. त्यामुळे लातूरसह अंबेजोगाई, केज, धारूर, कळंब या तालुक्यांच्या शहराबरोबरच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

कायम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणाऱ्या लातूरला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी मृतसाठ्यातून वर्षभर पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी शहराला दहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले. मृतसाठ्यातील पाणीही कमी झाले होते. दरम्यान, या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी प्रमाणात का होईना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरीस धरणातील मृतसाठ्याच्यावर पाणीसाठा गेला. त्यामुळे शहराला सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.
 
धरणाचा मृतसाठा भरल्यानंतर एक सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत धरणातील पाण्यात चांगली वाढ झाली. बुधवारी (ता. २३) सकाळी सहा ते दुपारी दोन या आठ तासांत धरणातील पाणीसाठ्यात १.६ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली. त्यामुळे एकूण पाणीसाठा १०५.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४६ टक्क्यांवर पोहचला. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी मोठा पाऊस झालेला नाही. मात्र, परतीचे मोठे पाऊस होतील, अशी आशा आहे. हे पाऊस झाले तर धरणात समाधानकारक पाणीसाठा होऊन लातूरचा पाणीप्रश्न काही अंशी मिटण्याची शक्यता आहे. 

आकडेवारी... 
 
धरणाचा प्रकल्पीय साठा     २२४.०९ दलघमी 
सध्याचा एकूण पाणीसाठा    १०५.६५ दलघमी 
एकूण उपयुक्त पाणीसाठा   १७६.९७ दलघमी 
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा   ५८.५२ दलघमी 
एकूण मृत पाणीसाठा            ४७.१३ दलघमी 
सध्याचा मृत पाणीसाठा         ४७.१३ दलघमी 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water storage in Manjara dam at Latur has reached 46 percent