टॅंकरातल्या पाण्याचा लई वास येतंय रं बाबा (व्हिडीओ)

बीड - भर उन्हात डोक्‍यावर हंडे घेऊन पाणी वाहताना लहान मुली आणि महिला.
बीड - भर उन्हात डोक्‍यावर हंडे घेऊन पाणी वाहताना लहान मुली आणि महिला.
Updated on

बीड - पवायला कुणालाच येत नाही, गेल्या वर्षी एक पोरगी हिरीत पडली अन्‌ तिचा पाय मोडला. आमाला तरी काय हौस आलीय का हिरीत उतरायची. पण, टॅंकरातल्या पाण्याचा लई वास येतंय बाबा, पाणीच पिऊ वाटत नाही, म्हणून हिरीतलं पाणी प्यावा लागतंय. पाण्याच्या तानापेक्षा मेलेलं बरं, हे सत्तर वर्षीय यमुना बर्डे या आजीबाईंची कैफियत तर, लग्नापासून पाण्यासाठी अशीच कसरत असल्याची कैफियत सुवर्णा पवार यांची. या दोन्ही प्रतिक्रिया टॅंकरने होणाऱ्या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे सामान्यांचे होणारे हाल अधोरेखित करत होते.

तालुक्‍यातील धानोरा येथील महादेव वस्तीवरील हे वास्तव ‘सकाळ’ने समोर आणले. महादेव वस्तीवरील महिला रस्त्याच्या कडेच्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरत होत्या. तीस ते चाळीस फूट खोल विहिरीला पायऱ्याही नाहीत. प्रत्येक सदरेवर (टप्प्यावर) एक अशी रांग लागली. खाली उतरलेल्या मुलीने हंडा भरून वरचीच्या आणि तिने पुन्हा वरचीच्या असा हंड्याचा प्रवास काठापर्यंत होत होता. याचे कारण, गावातील यमुना बर्डे, सुवर्णा पवार या दोन महिलांकडून अनुभव ऐकले. टॅंकरद्वारे येणारे पाणी दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याने ते तोंडातच घेऊ वाटत नाही. त्यामुळे महिलांना ही जीवघेणी कसरत करावी लागते. वृद्ध यमुनाबाईंना विहिरीतही उतरता येत नाही. त्यामुळे त्या वस्तीवरील मुली व महिला येण्याची वाट पाहत होत्या. यानंतर आलेल्या मुली आणि महिला विहिरीत उतरल्या आणि त्यांनी सर्वांचे हंडे भरले. भर उन्हात लहान मुली आणि गर्भवतींचा डोक्‍यावर हंडे घेऊन घराकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. एकूणच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे ही जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे या उदाहरणातून समोर आले. मात्र, विहिरीत उतरलेल्यांपैकी कोणालाच पोहता येत नाही. जर, कोणी पडले तर काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. 

टॅंकरमध्ये तलावातले गढूळ पाणी 
यानंतर प्रस्तूत बातमीदाराने शासकीय पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरचा उद्‌भव असलेल्या बिंदुसरा धरणाला भेट दिली. या ठिकाणी टॅंकरमध्ये भरले जाणारे पाणी गढूळ होते. त्यात ना ब्लिचिंग पावडर टाकली जात होती, ना कुठले शुद्धीकरण केले जात होते. असलेच पाणी गावोगाव पोचत असल्याने ते तोंडात कसे घ्यायचे, असा प्रश्न आहे.

माझ्या लग्नापासून पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला अशीच कसरत करावी लागते. चार वर्षांपूर्वी पाणी काढताना एक मुलगी पडून तिचा पाय मोडला होता. पण, पाणीच नसल्याने काहीच इलाज नाही.
- सुवर्णा कैलास पवार, धानोरा, (बीड) 

पवायला कुणालाच येत नाही, गेल्या वर्षी एक पोरगी हिरीत पडली अन्‌ तिचा पाय मोडला. आमाला तरी काय हौस आलीय का हिरीत उतरायची. पण, टॅंकरातल्या पाण्याचा लई वास येतंय बाबा, पाणीच पिऊ वाटत नाही, म्हणून हिरीतलं पाणी प्यावा लागतंय.
- यमुना बर्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com