
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी रविवारी (ता. १०) पहाटे पाच वाजता खेडेगावात पोहोचले.
परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी रविवारी (ता. १०) पहाटे पाच वाजता खेडेगावात पोहचले.
रविवार (ता. 10) जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यातील पिंगळी बाजार या ग्रामपंचायतीमध्ये पहाटे पाच वाजता जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम हागणदारीच्या मार्गावर धडकली आणि उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांना शौचालय वापरा बाबतची माहिती पुस्तिका देऊन त्यांना शौचालयाचा नियमित वापर करण्याची विनंती केली. तर विनंती करूनही काही नागरिक ऐकत नसतील तर अशा नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यानंतर गावाच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन गुड मॉर्निंग पथकाने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच गावातून स्वच्छता फेरी काढून नळ कनेक्शनची पाहणी करून पाणी बचती बाबत टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा - नांदेड ः बच्चेकंपनींनी यंदा सहल आणि गॅदरिंगला केले ‘मिस’
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी उपस्थित गावकऱ्यांना शौचालयाच्या नियमित वापरा बाबत मार्गदर्शन केले ते म्हणाले की, उघड्यावर शौचास गेल्यामुळे महिलांना पोटाचे आजार बळावत आहेत, माणसाचं आरोग्यमान कमी होऊन येणारी पिढीही रोगीट होण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच माशांमार्फत, दूषित पाण्यातून, खान्यातून अनेक रोग उद्भवत आहेत. नागरिकांनी टी व्ही, मोबाईल, गाडी अशा चैनीच्या वस्तू पेक्षा शौचालयाचे बांधकाम आणि त्याच्या नियमित वापरावर भर देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी टाकसाळे यांनी केले
यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता गंगाधर यंबडवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनुप पाटील, गावचे सरपंच जगन्नाथ गरुड, उपसरपंच अनंत गरुड, ग्रामसेवक तुकाराम साके, आशाताई अंगणवाडी ताई यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
संपादन- प्रल्हाद कांबळे