नांदेड पोलिसांना झाले तरी काय...? पुन्‍हा दोनजण लाचेच्या जाळ्यात 

file photo
file photo

नांदेड : पोलीस दलाला लागलेली लाचखोरीची कीड संपता संपत नसल्याचे दिसून येते. नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी बुधवारी (ता. १२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. विमानतळ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी तुकाराम विठ्ठलराव जायभाये आणि भाग्यनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी महेश भाऊराव आडे यांना १० हजार रुपये लाचेच्या रकमेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या वाढत्या घटनांवरून नांदेड पोलिसांना झाले तरी काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. का वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना आवर घलण्यास कमी पडत आहेत की काय अशी चर्चा पोलिस दलातून ऐकावयास मिळत आहे.  

या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलास धनादेश बँकेत न वठल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्यास जामीन मिळवून देण्यास मदत करतो आणि हातकडी न लावता न्यायालयात हजर करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक तुकाराम विठ्ठलराव जायभाये यांनी केली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महेश भाऊराव आडे यांनी जायभावे यांना या लाच प्रकरणात मदत केली.

जिल्हा न्यायालय परिसरात झाला सापळा
 
या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आल्यानंतर बुधवारी (ता. १२) फेब्रुवारी रोजी न्यायालय परिसरातील कॅन्टीनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात पोलीस नाईक जायभये आणि त्यांना मदत करून श्री आडे यांनी ती लाच स्विकारण्यास सहकार्य करून दहा हजार रुपये लाच स्वीकारली. यावेळी हे दोघेही रंगेहात लाचेच्या जाळ्यात अडकले. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यामध्ये लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांनी घेतले परिश्रम

सापळा यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पखाले, पोलीस नाईक बालाजी तेलंग, गणेश तालकोकुलवार, हणमंत केजकर, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी पार पाडला. नांदेड पोलीस विभागातील लाचखोर दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पुन्हा एकदा नांदेडच्या पोलीस दलातील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

एका सापळ्यात दोन ठाण्याचे कर्मचारी ही जिल्ह्यातील दुसरी वेळ
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात यापूर्वी दोन पोलिस ठाण्याचे फौजदार अडकले होते. त्यांनीही दहा हजाराची लाच मागितली होती. त्यात एक शिवाजीनगर आणि दुसरा भाग्यनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. असाच प्रकार बुधवारी पुन्हा घडल्याने पोलिस दलात चांगलीच चर्चा रंगली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com