पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार? 

प्रा. प्रवीण फुटके 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर समर्थकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्ट शेअर केल्याने राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले.

हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे.

हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह

दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.  
 
पंकजा मुंडे यांचे ट्‌विट 
12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

आजपासून आरोग्य शिबिर 
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What role will Pankaja Munde play?