पिकांच्या नुकसान भरपाईची घोषणा घोषणाच राहते का? प्रशासनास अधिकृत पत्र नाही

Heavy Rain hit Crops
Heavy Rain hit Crops
Updated on

घनसावंगी (जि.जालना) : अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी घनसावंगी महसूल विभागाकडून नुकसानीचे बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी मागील वर्षीच्या नुकसानभरपाईच्या परिपत्रकानुसार निधीची मागणी केली आहे. दुसरीकडे राज्य शासनाने नुकसानीपोटी घोषित करण्यात आलेली मदतीचे अद्याप प्रशासनाला कोणतेही अधिकृत पत्र नसल्याने नुकसानीपोटीची घोषणा केवळ घोषणाच राहते का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


तालुक्यात यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसाने मूग, कापूस, सोयाबीन, बाजरी, मका या खरीप हंगमातील पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्‍यांची हाती यंदा काही आले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणांवर या पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्‍यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकली नाही त्याठिकाणी बैलगाडी, मोटासायकलसह छोट्या वाहनातून ही नेतेमंडळी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पोचली. त्यांची मोठी वाहवा झाली.


दरम्यान शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तातडीने पंचनामे अधिक गतीने व अचूकपणे होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आल्याने या पंचनाम्यास गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून दिसून आले. दरम्यान राज्य शासनाने या नुकसानीपोटी जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये, फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये सदर अनुदान दोन हेक्टर पर्यत देण्याची घोषणा केली.

त्यामुळे पूर्वीच्या अनुदानापेक्षा यंदा अनुदान जास्तीचे व चांगल्या प्रमाणात आल्याने या नुकसानीतून हाती काही आलेले नाही. शेतकऱ्‍यांनी या अनुदानाबद्दल समाधान व्यक्त करून सदर अनुदान दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु संबंधित नुकसानीच्या पोटी शासनाने घोषित केलेल्या अनुदानांचे कोणतेही शासकीय परिपत्रक काढले नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने पूर्वीच्या निकषानुसार जिरायती सहा हजार आठशे रुपये हेक्टर, बागायती व फळपिका करीता अठरा हजार रुपये हेक्टर या प्रमाणे शासनाकडे तालुक्यातील क्षेत्रानुसार ५८ कोटी ३३ लाख, ३९ हजार ५०० रुपयांच्या अनुदानांची मागणी वरिष्ठस्तरावर केली आहे.

७७ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान
घनसावंगी तालुक्यातील संपूर्ण ११७ गावांतील एकूण ९५ हजार ४३३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. एकूण एक लाख २ हजार हेक्टर ७३ आर पेरणीलायक क्षेत्रापैकी ९९ हजार नऊशे हेक्टर ७३ आर क्षेत्रांवरील खरीप पिकाची पेरणी झाली. त्यातील ७२ हजार ८५५ हेक्टर जिरायती तर २५ हेक्टर बागायती व ४ हजार ८६६ हेक्टर असे एकूण ७७ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार पूर्वीच्या आदेशानुसार दोन हेक्टरपर्यत भरपाई पाहता जिरायती ६८०० रुपये, बागायती १३ हजार ५०० तर फळपिेके १८०० या प्रमाणे ६१ कोटी ३५ लाख १३ हजार ८२० रुपये निधीची आवश्यकता आहे.


अतिवृष्टीच्या पावसाच्या नुकसानीपोटी शासनाकडून अपेक्षित पिकांचे नुकसानीपोटी अनुदानांची मागणी करण्यात आली आहे. मात्र नुकतीच शासनाकडून करण्यात आलेल्या मदतीची घोषणेच्या निकषानुसार प्रशासनास कोणतेही अधिकृत पत्र आले नाही. त्यामुळे आम्ही पूर्वीच्या पत्रकाप्रमाणे रक्कमेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. प्रशासनास पत्र आल्यास पुन्हा निधीची मागणी करण्यात येईल.
- नरेंद्र देशमुख , तहसीलदार, घनसावंगी

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com