
हिवाळ्यात अचानक होणारा वातावरणातील बदल शरीराला एकदम मानवत नाही. कधी बोचरी थंडी, कधी गुलाबी थंडी तर कधी रक्त गोठून टाकायला होणारी अशी थंडीची विविध रूपे अनुभवायला मिळतात.
औरंगाबाद : हिवाळ्यात अचानक होणारा वातावरणातील बदल शरीराला एकदम मानवत नाही. कधी बोचरी थंडी, कधी गुलाबी थंडी तर कधी रक्त गोठून टाकायला होणारी अशी थंडीची विविध रूपे अनुभवायला मिळतात. या काळात स्निग्धपदार्थ, बिया असलेल्या भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. थंडी सुरू झाली की उबदार कपडे बाहेर निघतात. थंडीचा सामना करताना विशेषतः लहान मुले, वृद्ध, दमा, सांधीवाताचे रुग्ण यांना खूप कठिण होते. यासाठी या दिवसात आहाराकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. आहारतज्ज्ञ रसिका देशमुख म्हणाल्या, की या दिवसांत काही काही खावे वाटत असते.
उच्च रक्तदाबाकडे नको दुर्लक्ष, हवे नियंत्रण
पण ते पचवले पाहिजे. या दिवसात स्नायूंचे दुखणे वाढल्यास आहारात मसालेयुक्त पदार्थ, अद्रक, लसणाचा वापर करावा. स्निग्धपदार्थ जरूर खावेत. मात्र अतिरेक टाळावा. वाढत्या वयाच्या मुलांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकास व पोषणासाठी हिवाळा ऋतू अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी त्यांना या दिवसात घरच्या घरी हरभरा डाळ, उडीद डाळ, तीळ प्रत्येकी एक चमचा, खसखस अर्धा चमचा, ४ बदाम आणि १२ काळे मनुके रात्री भिजत ठेवावे, सकाळी ते गाळून पाणी प्यायला द्यायचे व भिजलेले धान्य चावून खायला द्यायचे. यावर एक ग्लास दूध प्यायचे हे अतिशय पौष्टीक टॉनिक आहे.
आहरतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितले, की हिवाळ्यात शरीरातील आणि बाहेरील तापमानात फरक असतो. यामुळे शरीराला स्निग्धपदार्थांचे आहारात समावेश करावा. या दिवसात केले जाणारे डिंकाचे लाडू शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. बिया असणाऱ्या भाज्यांचे प्रमाण आहारात असावे. हिवाळ्यात नाष्ट्यामध्ये पौष्टीक पराठ्यांचा वापर करावा. यात मुळा, कडीपत्ता, बीट, गाजर, पत्तकोबी, कोथिंबिरी आणि शेवग्याच्या कोवळ्या पानांचे आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी खाणे खूप आरोग्यदायी आहे. तसेच मोड आलेले हरभरे खावे. अँटी बॉडीज वाढवण्यासाठी आवळा, पांढरट कारल्यांचा आहारात समावेश करावा.
संपादन - गणेश पिटेकर