खुद्द साक्षीदारच न्यायालयात दारूची बाटली घेऊन येतो तेव्हा......(वाचा काय घडलं)

सुषेन जाधव
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

  • पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  • औरंगाबाद जिल्हा न्यायालयातील प्रकार

औरंगाबाद : कौटुंबिक वादाच्या खटल्यात साक्ष देण्यासाठी न्यायालयात आलेल्या एका चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदरील चालकाने न्यायालयाच्या इमारतीत दारूची बाटली आणल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. पाच) सकाळी 11.05 वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर घडली.

हेही वाचा- औशाच्या तहसीलदारांना 10 हजार रुपये दंड (वाचा कशामुळे)

राम राजू पवार (29, रा. कृष्णमंदी, रेल्वेगेट, चिकलठाणा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 140 रुपये किमतीची दारूची बाटली जप्त करण्यात आली आहे. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्याचे शिपाई संजय राठोड (वय 39) यांच्या तक्रारीनुसार, राठोड व त्यांचे सहकारी हवालदार दिगंबर राठोड, पोलिस शिपाई वंदना गवळी, वैशाली पांचाळ असे चौघे जिल्हा न्यायालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करीत आपले कर्तव्य बजावत होते. सकाळी 11.05 वाजेच्या सुमारास आरोपी राम पवार हा बॅग घेऊन काही नातेवाइकांसोबत न्यायालयात प्रवेश करीत होता. तेव्हा पोलिसांनी त्याची तपासणी केली व बॅग तपासणीसाठी देण्याचे सांगितले; मात्र रामने त्याला नकार दिला. पोलिसांनी त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने बॅग तपासणीसाठी दिली असता त्यात ओसी ब्ल्यू नावाची 140 रुपये किंमतीची दारूची बाटली पोलिसांना निदर्शनास आली.

गुन्हा दाखल
प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम 65 (ख) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वये वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिले.

हे वाचलंत का?- महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When the witness comes to the court with a bottle of Alcohol