औशातील अवैध धंद्यांना अभय! तरुणाई झाली कंगाल, पालकमंत्री अमित देशमुख देणार का लक्ष?

1crime1_7
1crime1_7

औसा (जि.लातूर) : हप्तेखोरीच्या विरोधात आक्रमक असलेले तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार म्हणून आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यात वाळु, मटका, गुटखा विरोधात आवाज उठवुन सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला हात घातला होता. मात्र आता त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आले असतांना कधी नव्हे एवढे अवैध धंद्यांनी जिल्ह्यात आणि विशेषतः औसा तालुक्यात आपले हातपाय पसरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

शहरात गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून गल्लीबोळात राजरोसपणे सुरु असलेला मटका आणि पावला पावलावर मिळणारा गुटखा पाहिला की अवैध धंद्याविरोधात राळ उठविणाऱ्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मटक्याने कळस गाठला असल्याचे वास्तवसमोर येत आहे. औसा शहरात तर दररोज पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल मटक्याच्या खेळात होत असतांना हप्ते खाणारे मालामाल होत आहेत, तर मटक्याच्या आकड्यात तरुणाई कंगाल होत आहे. रोजरोसपणे मटक्याची दुकाने थाटणाऱ्यांना अभय कोणाचे असा प्रश्न औशातील नागरिक करीत आहेत.

संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री असतांना विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीसह वाळुचोरी, मटका, गुटखा आणि अन्य अवैध धंद्यांबाबत व जिल्ह्यातील घसरलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल वेळोवेळी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजपवर टीका करीत संबंधित अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले होते. सत्ता परिवर्तन झाले, अमित देशमुख मंत्री होऊन त्यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आली.

लातुरच्या संस्कार आणि संस्कृतीवर नेहमी भर देत केलेली टीका त्यांच्या कार्यकाळात बदलाचे रुप घेईल असे जिल्ह्यातील विशेषतः औसा तालुक्यातील लोकांना आशा होती. मात्र यात काहीच बदल झाला नाही. यात आमुलाग्र बदल होईल ही अपेक्षा असतांना औशात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असुन शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय या मुख्य सरकारी कार्यालयासमोरच मटका बुकींनी पत्र्यांचे डब्बे टाकुन आणि टपऱ्या उभारून मटक्यांची आस्थापणे सुरु आहेत. या बाबत येथील पोलिस प्रमुखांची नेहमी संबंधीत मटका व्यावसायिकांवर मेहेर नजर असल्याने मटक्याचे साम्राज्य वाढतच आहे.

शहरात दररोज पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल या आकड्यात होत आहे. यात उधारी, उसनवारी लागलेल्या आकड्यातून बेबाकी करण्याचा नवा फंडा बुकींकडून चालत आहे. वेळेवर हप्ते जात असल्याने कारवाई करणे तर दुरच पण कोणी या विरोधात तक्रार केली, तर तक्रारदाचाच कायदेशीर बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम येथील पोलिसांकडून केला जातो. काहीही करा पण मटका बंद झाला नाही पाहिजे" याची काळजी घेण्याची सक्त ताकीद संबंधीत बुकींना पोलिसांकडून मिळाल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. बुकींनीही मग थेट सरकारी जागेवर आपली दुकानदारी सुरु केल्याची चर्चाही शहरात आहे. औशातील अवैध धंदे आणि या अवैध धंद्याना अभय देणाऱ्या विरोधात आता पालकमंत्र्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी शहरवासीयांतुन केली जात आहे.

संपादन- गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com