कोण होणार पुढील महापौर?

माधव इतबारे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

  • आरक्षणाची बुधवारी मुंबईत निघणार सोडत 
  • विद्यमान महापौर, सभापतींनाही आमंत्रण 

औरंगाबाद-राज्यातील 27 महापालिकांसह औरंगाबाद शहराचा पुढील महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार हे बुधवारी (ता.13) स्पष्ट होणार आहे. महापौर पदासाठी उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रधान सचिवांच्या उपस्थित होणाऱ्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचना तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. महापालिका प्रशासनातर्फे प्रभाग रचना तयार केली जात असतानाच बुधवारी राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात काढली जाणार आहे.

औरंगाबादसह इतर महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतील महत्त्व प्राप्त झाले आहे. आरक्षण सोडतीसाठी महापौर, स्थायी सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात अव्वर सचिवांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
अनुसूचित जातीसाठी राखीव होण्याची शक्‍यता 
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ऑगस्ट महिन्यात माहिती मागविली होती. 2001 पासून आतापर्यंत महापौरपदासाठी निश्‍चित झालेला आरक्षणाचा प्रवर्ग, आरक्षण निश्‍चितीचा अधिसूचनेची दिनांक, आरक्षणाचा कालावधी महापौरपदी विराजमान असलेल्या व्यक्तीचे नाव, सध्या सुरू असलेल्या महापौरपदाचा प्रवर्ग व कालावधी संपण्याची दिनांक, 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती महापालिकेने कळविल्यानंतर आरक्षण सोडत काढली जात आहे. औरंगाबाद महापालिकेत आतापर्यंत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एकही महापौर झालेला नाही, त्यामुळे यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 
महापौरपदासाठी आरक्षणाचा तपशील असा 
2001 पासूनचे आरक्षण असे; सुरुवातीला नागरिकांचा मागासवर्ग आरक्षणात महापौरपदी डॉ. भागवत कराड आणि विकास जैन, महिलासांठी राखीव आरक्षणात महापौरपदी विमल राजपूत, रूख्मिणी शिंदे, सर्वसाधारण आरक्षणात महापौरपदी किशनचंद तनवाणी, विजया रहाटकर, ओबीसी महिलांसाठी आरक्षणामध्ये महापौरपदी अनिता घोडेले, सर्वसाधारण महिलासाठी आरक्षणात महापौर म्हणून कला ओझा, सर्वसाधारण आरक्षणात महापौर म्हणून त्र्यंबक तुपे, भगवान घडमोडे, ओबीसी आरक्षणात महापौरपदी नंदकुमार घोडेले यांची आतापर्यंत नियुक्ती झालेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be the next mayor?