आता देवेंद्र फडणवीस टार्गेट, पंकजा मुंडेंना कोण देतेय साथ?

दत्ता देशमुख
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने भाजपचे आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.

बीड -  भाजप सोडण्याची थेट घोषणा टाळली असली तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन आणि राज्यभरातील दौरे करण्याची घोषणा करीत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष भाजपला बायपासच करण्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांत विविध मुलाखतींत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही निशाणेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे या बायपास रस्त्याने पंकजा मुंडेंच्या साथीने कोण-कोण चालणार? असा प्रश्न आहे. कारण, फडणवीस हे त्यांच्या निशाण्यावर असल्याने आमदार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.

मास लीडर असल्याने पंकजा मुंडेंना बेदखल करणे भाजपलाही परवडणारे नाही; पण भाजपची सध्याची बांधणी आणि वाटचाल पाहता राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र आणि शहा असेच व्यक्तिकेंद्रित चित्र आहे. मोदी-शहांनी राज्यात भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीसांना जसे हवे तशी भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांची फडणवीसांवरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून नाराजी उघड करतानाच आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने आपल्याला काढायचे असेल तर निर्णय घ्यावा, असे सांगत पुढची दिशा ठरवून टाकली आहे.

हेही वाचा - फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता...पंकजा मुंडे

भाजप कोअर समितीतून मुक्त होण्याची घोषणा करतानाच आपण आता मोकळी असल्याचे सांगत आता फक्त परळीची नसून राज्याची झाल्याचे सांगत त्यांनी नेतृत्वाला अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. राज्यभरातील दौरे आणि औरंगाबाद येथे होणारे एकदिवसीय उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचे जाहीर करीत त्यांनी भाजपला बायपास करीत असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. दोन दिवसांत माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवरही निशाणे साधले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण राहणार? असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा - सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्याती हे काम मार्गी लागणार

मागच्या सत्तेच्या काळात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यांना बीडसह नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, परभणी जिल्ह्यांतील आमदार हजेरी लावत. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांचे नेतेही हजेरी लावत. परवाच्या मेळाव्यालाही भाजपच्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. त्या माध्यमातून त्या या आमदारांना त्यांच्यामागील ताकद दाखवीत आणि पक्षालाही जाणीव करून देत; परंतु त्यावेळी सर्वांच्या मागे भाजप होते. परंतु आता भाजपला बायपास करून त्या नव्या रस्त्याने वाटचाल करणार आहेत. त्यांच्या निशाण्यावर फडणवीसही आहेत. त्यामुळे या वाटचालीत त्यांच्या साथीला कोण-कोण आमदार असणार, याकडे लक्ष लागले आहे. 
 
"त्या' आमदारांनाही दुहेरी भीती 
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजपला बायपास करणारी भूमिका तर घेतली आहेच. शिवाय फडणवीसही त्यांच्या निशाण्यावर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस भाजपचे विधिमंडळाचे नेते असून विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे पंकजांची साथ देताना फडणवीस दुखावणार, हेही निश्‍चित आहे. त्यामुळे आमदार मंडळी दुहेरी कात्रीत सापडली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will support Pankaja Munde