सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्यातील हे काम मार्गी लागणार

पांडुरंग उगले 
शनिवार, 14 डिसेंबर 2019

राज्यात सत्तांतर हाेताच बीड जिल्ह्यातील माजलगाव  तालुक्यातील रखडलेली याेजना मार्गी लागणार आहे. आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली लोणीसावंगी उपसा योजना भाजप सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती. वास्तविक 75 टक्के निधी खर्च झाल्यानंतर ही योजना बंद केली हाेती.

माजलगाव (जि. बीड) - आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली लोणीसावंगी उपसा योजना भाजप सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती. वास्तविक 75 टक्के निधी खर्च झाल्यानंतर बंद केलेल्या योजनेला राज्यातील सत्तांतरामुळे चालना मिळणार आहे. खाते वाटपानंतर जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे आल्याने आमदार प्रकाश सोळंकेंच्या माध्यमातून ही योजना पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍यासाठी जलसंजीवनी असलेले माजलगाव धरण सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पूर्णक्षमतेने भरत नव्हते. यामुळे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी उपसा करून ते माजलगाव धरणात सोडण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 2009 मध्ये लोणी संवागी उपसा योजना मंजूर केली होती. 163 कोटी रुपयांची निविदा स्वीकारून संबंधित ठेकेदाराने कामही सुरू करीत योजनेवर जवळपास 122 कोटी रुपयांचा निधी (एकूण योजनेच्या 75 टक्के) खर्च करून पाइपलाइनसह इतर साहित्य खरेदी करीत दोन पंप हाउसचे काम पूर्णत्वास आले होते.

हेही वाचा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?

2014 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप सेनेचे सरकार आले अन्‌ अवघ्या चार महिन्यांत ही योजना व्यवहार्य नसल्याचे सांगत भाजप नेत्यांनी ती बंद केली. पाच वर्षे या योजनेचे संपूर्ण काम बंद राहून विविध साहित्य धूळखात पडले होते; परंतु नुकतेच राज्यात पुन्हा सत्तांतर झाले अन्‌ जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे आले आहे. मोठ्या महत्प्रयासाने मंजूर केलेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळाली आहे. यामुळे त्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा एकदा ही योजना सुरू होऊन पूर्णत्वास जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

पाणीटंचाईवर मात करणारी योजना 
माजलगाव धरण रिकामे असताना गोदावरी नदीतून पुराचे पाणी वाहून जाते याचा प्रत्यय यावर्षी आला. या योजनेतून वाहून जाणारे 150 दलघमी पाणी धरणात सोडून त्यातील 90 दलघमी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे प्रयोजन आहे. यामुळे माजलगाव शहरासह परिसरातील खेड्यापाड्यांतील पाणीटंचाईवर मात करणारी महत्त्वाची योजना आहे. 

माजलगाव तालुक्‍यातील नागरिकांच्या दृष्टीने पाणीटंचाईवर मात करणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करणे माझे प्रथम ध्येय आहे. येत्या अधिवेशनात संबंधित मंत्र्यांना पत्र देऊन तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक लावणार आहे. यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करून ही योजना पूर्णत्वास नेणार आहे. 
- प्रकाश सोळंके, आमदार, माजलगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work that needs to be done