यामुळेच आयुर्वेदिक उपचाराला पसंती

जगन्नाथ पुरी
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

सेनगाव तालुका ठिकाणी मागील एक वर्षापासून आयुर्वेद चिकित्सालय सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास १४०० रुग्णांनी येथे विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार केले आहेत. जुनाट व असाध्य आजारातून रुग्णांना सुटका मिळाली आहे. त्याचप्रमाणे आता आयुर्वेद चिकित्साकडे रुग्णांचा कल वाढल्याचे चित्र आहे.

सेनगाव(जि.हिंगोली) : आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा उगम दोनशे वर्षांपूर्वीचा आहे. तर आयुर्वेद विज्ञानाचा प्रवास पाच हजार वर्षांपासून आहे. दोन्ही चिकित्सा पद्धतीचे स्वतंत्र महत्व आहे. झटपट उपचारासाठी अॅलोपॅथीचा वापर होतो. अलीकडच्या काळात वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षण आधुनिक होत चालले असून आयुर्वेद उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढला आहे. सेनगावात वर्षभरात १४०० रुग्णांनी त्‍याचा लाभ घेतला आहे.

मानवी जीवनातील विविध आजारावर आयुर्वेद उपचार पद्धती केल्या जातात. आधुनिक वैद्यकीय ज्ञानाचा उगम दोनशे वर्षांपूर्वीचा आहे ; तर आयुर्वेद विज्ञानाचा प्रवास पाच हजार वर्षांपासून आहे. दोन्ही चिकित्सा पद्धतीचे स्वतंत्र महत्त्व आहे. २१ व्या शतकात जीवनशैली बदलली आहे. धावपळीचे जीवनमान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यासह असंख्य कारणामुळे वेगळे विकार झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी छोट्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्यावर घरगुती उपचार केल्या जात असत. दवाखाना, मेडिकल सुविधांच्या अभावामुळे हा पर्याय वापरण्यावर भर होता.

हेही वाचा...खड्डा पाहण्यास पोलिस धावले अन् निघाले...

पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले

शहरासह ग्रामीण भागात दवाखाने, मेडिकलची सुविधा मागील काही वर्षांत उपलब्ध झाली. त्यामुळे घरगुती उपाय मागे पडत गेले. आरोग्याच्या विविध तक्रारीतून झटपट सुटका कशी मिळविता येईल, याकडे कल वाढत गेला. परिणामी अॅलोपॅथी दवाखान्याकडे रुग्ण संख्या वाढत गेली. या उपचार पद्धतीत नवीन नवीन आधुनिक संशोधनामुळे मलेरिया, डेंगी तसेच गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रियामुळे असंख्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे आयुर्वेद वापराचे प्रमाण कमी होत गेले. शिवाय ही उपचार पद्धतीकडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले.

आयुर्वेद चिकित्सा डॉक्टरांची संख्या वाढली  

एमबीबीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे स्पर्धेचे झाले. यात प्रवेश न मिळाल्याने अनेकजण पूर्वी आयुर्वेदाकडे वळत असत. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षण आधुनिक होत गेले आहे. या शाखेतील पदवी घेवून डॉक्टर झाल्यावर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आयुर्वेद चिकित्सा डॉक्टरांची संख्या वाढली आहे. इतर पॅथीचा गुण आला नाही; तर आयुर्वेदाकडे वळण्याचा निर्णय रुग्ण घेत आहेत. त्यामुळेच मुख्य प्रवाहातील चिकित्सा म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे.

दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते

योग्य आहाराच्या संतुलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने शरीरातील वात, कफ, पित्त यासह विविध आजार होतात. उष्ण वातावरणातही तिखट, आंबट जास्त खाण्यात आल्यावर आरोग्यासह स्वभावातही बदल होतो. कोणत्याही आजाराचा योग्य तज्ज्ञाकडून सल्ला घेतल्यावर त्याचा उपचारासाठी फायदा होतो. वारंवार गोळ्या, औषधी घेतल्याने त्याचा दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा...येथे बनावट दारूचा अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त

आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात उतरल्या कंपन्या

सेनगाव तालुका ठिकाणी मागील एक वर्षापासून आयुर्वेद चिकित्सालय सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास १४०० रुग्णांनी येथे विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार केले आहेत. जुनाट व असाध्य आजारातून रुग्णांना सुटका मिळाली आहे. त्याचप्रमाणे आता आयुर्वेद चिकित्साकडे रुग्णांचा कल वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान मागील काही वर्षात आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपन्या उतरल्या आहेत. विविध मेडिकलमध्ये सहजरीत्या औषधी उपलब्ध होत आहे. शिवाय या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी प्रसार व प्रसारात प्रचाराचे काम केल्यामुळे नागरिकांचा कल वाढण्यास मदत झाली आहे. विशेषतः या उपचार पद्धतीमुळे साईड इफेक्टची संभाव्य शक्यता नसल्यामुळे याकडे रुग्ण वळत आहेत.

पूर्ण आरोग्य मिळते

 आयुर्वेद चिकित्साकडे नागरिकांचा कल वाढत आहे. व्याधीवर मात करता येते, प्रतिबंध सुद्धा शक्य होते, हे वैद्यक शास्त्र नसून त्यासोबतच जीवनशैलीतही मार्गदर्शन करते. यातील औषधी पंचकर्म, आहार व विहार याच्या साह्याने पूर्ण आरोग्य मिळते. मागील एक वर्षात १४०० रुग्णांनी आयुर्वेदिक चिकित्सा घेतली असून याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे.
-डॉ. रामदास गिते, आयुर्वेद चिकित्सक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is why Ayurvedic treatment is preferred