का होतेय लिंबूमिश्रित काळ्या चहाला मागणी..?

जगन्नाथ पुरी
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

-चहा बनला जीवनाचा अविभाज्य घटक
-काळा चहा पचनसंस्थेला गुणकारी
-मित्रमंडळी, नातेवाइकांकडेही काळ्या चहाची मागणी
-हृदय निरोगी व बळकट राहण्यास मदत
-तणावातून सुटका होण्यास मदत

सेनगाव(जि. हिंगोली): लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेकांचा दिवस चहाने सुरू होतो. चहा जीवनाचा अविभाज्‍य घटक बनला आहे. काळा चहात टॅनिन हे द्रव असते. ते आपल्‍या पचन संस्‍थेला गुणकारी ठरते. त्यामुळेच अलीकडच्‍या काळात दुधाच्‍या चहाऐवजी काळा चहा, लिंबूमिश्रित काळ्या चहाला पसंती वाढली आहे.

प्रत्‍येक लहान बालकांपासून अबाल वृद्धांपर्यंत अनेकांची दिवसाची सुरवात चहाने होते. सकाळचा चहा घेतल्‍यानंतरच कामाला प्रारंभ होतो. चहाचे वेगवेगळे प्रकार असून यामध्ये दुधमिश्रित चहा, काळा व लेमन चहा असे प्रकार आहेत. दूधमिश्रित चहाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा चहा आरोग्‍यास त्रासदायक असला तरी हा चहा घेतला जातो. आम्‍लपित्त, अपचन, भूक न लागणे, उष्णता वाढविणे ही प्रमुख कारणे आरोग्‍याला तक्रारी सतावतात. तरीही मानवी जीवनात चहा हा अविभाज्‍य घटक बनला आहे.

हॉटेलवरही काळ्या चहाला मागणी

चहाची लागलेली सवय अचानक सोडणे सहजासहजी जमत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांकडून अनेक रुग्‍णांना दूधमिश्रित चहा सोडण्याचा सल्‍ला दिला जातो. त्‍याऐवजी काळा चहा लिंबाचा रस टाकून घेतल्‍यास आरोग्‍यासाठी हानीकारण नसते, असे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात दुधाच्‍या चहाऐवजी काळा चहा पसंत करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नातेवाईक व मित्राकडे गेल्‍यानंतर तिथेही काळा चहा करा, अशी थेट मागणी केली जात आहे. तसेच हॉटेलवरही काळ्या चहाची मागणी वाढली आहे.

काळा चहा हृदयासाठी अत्‍यंत गुणकारी

आयुर्वेद तज्ज्ञांकडून काळा चहा हृदयासाठी अत्‍यंत गुणकारी असून या चहाने सेवन केल्‍यास हृदय निरोगी व बळकट राहते, असे सांगितले जात आहे. दिवसभरात दोन ते तीन कप चहा घेतल्‍याने प्रोस्‍टेट, फुफ्फुस व किडणीच्‍या कर्करोगापासून मुक्‍ती मिळू शकते. मेंदूच्‍या पेशींनाही हा चहा प्रेरणा देतो. दुधाच्‍या चहाच्‍या तुलनेत काळा चहा पिल्‍याने दुष्परिणाम कमी व आरोग्‍यास फायदेशीर ठरत आहे. त्‍यामुळे अलीकडच्‍या काळात ‘ब्‍लॅक टी’ची क्रेझ झपाट्याने वाढली आहे.

तणावातून सुटका होते

दिवसेंदिवस मानवी जीवन धावपळीचे होत आहे. वातावरणातील थेट बदलाचे परिणाम आरोग्‍याच्‍या तक्रारी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. काळा चहा तीन ते चार वेळेस घेतल्‍यास तणावातून सुटका होते. या चहात टॅनिन हे द्रव असते व ते आपल्‍या पचन संस्‍थेला गुणकारी ठरते.
- डॉ. गजानन पायघन, सेनगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is the demand for lemonade black tea ..?