अंनिसचे राज्य सरचिटणीस का लावतात सदैव काळी फित? वाचा..

shahaji bhosale
shahaji bhosale

औरंगाबाद - कोणत्याही गोष्टीचा निषेध करायचा असल्यास काळी फित लावली जाते. त्यातुन आपण शासकीय, प्रशासकीय कारभार, एखादे कृत्य याबाबत रोष, संतोप, नाराजी व्यक्त करीत असतो. औरंगाबाद शहरात गत सहा वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस 
शहाजी भोसले हे त्यांच्या शर्टच्या खिशावर काळी फित लावतात. त्याचे कारणही अत्यंत गंभीर आहे. ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या. 

वीस ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. पुण्यातील ओंकारेश्‍वर पुलावर ही हत्या घडवून आणण्यात आली. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे पडसाद राज्यासह इतर ठिकाणीही उमटले.

प्रचंड रोष, संताप व्यक्त झाला. याबाबत तपास संस्थाकडून छडा लावण्याचे प्रयत्न झाले. पण डॉ. दाभोळकरांना न्याय अद्याप मिळाला नाही अशी भावना अंनीसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी व्यक्त केली. तेव्हापासून ते निषेध म्हणून काळी फितही लावतात.

याविषयी ते काय म्हणाले  
""आधी धर्मांध शक्तीचा भाग होतो. पण केवळ चाळीस मिनिटांचे डॉ. दाभोळकरांचं श्रद्धा व अंधश्रद्धा हे व्याख्यान ऐकलं आणि मी अंनीसचा कार्यकर्ता झालो. डॉ. दाभोळकरांची हत्या झाली. त्या दिवशी व त्यानंतर परिषदा व इतर काहीवेळा निषेध म्हणुन कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या. 

पण आज मी जो आहे, केवळ त्यांच्यामुळे आहे. याचा विसर पडू नये म्हणून त्यांच्या हत्येच्या दिवशी अर्थात 20 ऑगस्ट 2013 ला शपथ घेतली व तेव्हापासून मी काळी फित लावतो. शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जोपर्यंत पुरेपुर न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी माझी ही काळी फित काढणार नाही. प्रत्येक दिवस हा शासनाच्या विरोधातला माझा निषेध असेल. बऱ्याचदा फित काढा म्हणुन लोकांनी विरोध केला असेल तरीही मी फित काढली नाही. शर्ट बदलला तरी मी माझी फित काढुन दुसऱ्या शर्टला लावतो.

अनेकजण म्हणतात की संशयित पकडले जाणार नाही. पण मला खात्री आहे की शेवटी सत्याचाच विजय होईल व एक दिवस येईल तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना न्याय मिळाला असेल मग मी फित आनंदाने काढेल. 

नवीन सरकारकडून अपेक्षा. 
सरकार येतील जातील. आज हे उद्या ते असतील. मनापासून डॉ. दोभाळकरांना न्याय द्यायचा आहे. हे ठरवल तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. दाभोळकरांना न्याय मिळु शकतो. पण सरकार मनापासून काम करीत नाही म्हणून ही खेदाची बाब आहे. नवीन सरकार एका पक्षाचे नाही ते तीन पक्षाचे आहे. त्यामुळे अपेक्षा अधिक आहे की, काहीतरी चांगले होईल. सरकार मनापासून लक्ष घालीत नाही. तोपर्यंत हा तपास नावालाच असेल. माझ्या हयातीत जोपर्यंत योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही फित काढणार नाही. 

अशी झाली होती डॉ. दाभोलकरांची हत्या 
वीस ऑगस्टच्या पहाटे ओंकारेश्‍वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ मारेकऱ्यांना त्यांना दिसले; परंतु त्यातील नेमके दाभोलकर कोणते, याचा अंदाज मारेकऱ्याला आला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी एक मारेकरी बिचकला होता. त्याची चलबिचल सुरू असतानाच अन्य एका गृहस्थाने डॉ. दाभोलकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला अन्‌ तेथेच त्या मारेकऱ्याचे "लक्ष्य' निश्‍चित झाले होते. यानंतर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com