हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील का संतापले ? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. तसेच अस्वच्छता दिसताच अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात सूचना देत आहेत. 

जवळा बाजार (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी (ता. २०) खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील अस्वच्छता पाहता कर्मचाऱ्यांना खडसावत रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना केल्या.

या वेळी वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हा परिषद सदस्य राजू चापके, आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माऊली झटे आदींची उपस्‍थिती होती.

हेही वाचा - Video ः रोगप्रतिकारशक्‍तीच्या वाढीसाठी या पंचसूत्रीचा अवलंब करा

अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

या वेळी खासदार श्री. पाटील यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृह, रुग्णांच्या बेडची पाहणी केली. येथील अस्वच्छता पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.  

चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन

तसेच रुग्ण कल्याण समितीचा मिळालेला निधी कशावर खर्च केला, अशी विचारणा केली. या वेळी आरोग्य केंद्रातील स्‍वच्‍छतेकडे लक्ष दिले जाईल, तसेच रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाईल, असे आश्वासन आरोग्य अधिकाऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांना दिले.

ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

कळमनुरी: सोशल मीडिया ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी उमरा (ता. औंढा नागनाथ) येथील ग्राम विकास अधिकाऱ्याला उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी कारणे दाखवा नोटीस देत खुलासा मागविला आहे.

व्हाट्सॲप ग्रुपवर टाकला मेसेज

कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. सोशल मीडियामधून या आजाराविषयी अफवा व आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, फॉरवर्ड करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही उमरा येथील ग्रामविकास अधिकारी रमेश श्रावणे यांनी सोमवारी (ता. २०) एका व्हाट्सॲप ग्रुपवर महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन होईल असा मेसेज टाकला. 

गुन्हा दाखल करण्याचा इशारा

उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर यांनी पोस्टची पाहणी केली. त्यानंतर शासनाची प्रतिमा मलीन करून संकटाच्या काळात आक्षेपार्ह पोस्ट ग्रुपवर टाकल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी रमेश श्रावण यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मुदतीत खुलासा न मिळाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कळमनुरी महसूल पथकाची दंडात्‍मक कारवाई

कळमनुरी : तहसील कार्यालयाच्या पथकाने सोमवारी (ता. २१) कोंढूर व डोंगरगाव नाका येथे कार्यवाही करीत अनधिकृतपणे वाळू उपसा करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत राजस्‍थानकडे जाणारे २६३ कामगार सीमाबंदीमुळे अडकले

पोलिस ठाण्यात लावली वाहने

सोमवारी रात्री कोंढूर येथे वाळू वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून मंडळ अधिकारी श्री. सुळे, तलाठी गंगाधर पाखरे, श्री. सोनटक्के, श्री. होनमाने यांच्या पथकाने नारायण पतंगे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३८ बी २३४०) ताब्यात घेऊन कळमनुरी पोलिस ठाण्यात लावण्यात आले.

कायदेशीर कारवाई

 दुसरी कारवाई डोंगरगाव नाका येथे करण्यात आली. मंडळ अधिकारी आर. व्ही. सावंत, कर्मचारी अजिंक्य पंडित यांच्या पथकाने ट्रॅक्टर मालक अशोक उफाडे यांचे ट्रॅक्टर ताब्यात घेत कारवाई केली. या दोन्ही वाहनाविरुद्ध प्रत्येकी एक लाख पंचवीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून वाहन मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता महसूल प्रशासनाने तयारी चालवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is Hingoli MP Hemant Patil angry? Read ... Hingoli news