Video : जुळ्या मुला-मुलींमध्ये का असतो एकसारखेपणा?

संदीप लांडगे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

एका स्पर्मपासून ही जुळी बाळे तयार होतात. जी जुळी बाळे डिझायगोटिक ट्‌विन्स होतात, त्यांमध्ये दोन स्पर्म्सचा संबंध येऊन बाळाची निर्मिती होते. यामुळे या जुळ्या बाळांचे जेनेटिक कम्पोझिशनदेखील वेगवेगळे असते.

औरंगाबाद : जुडवा, सीता और गीता, चालबाज, राम और शाम, जुडवा-2 अशा चित्रपटांतून सलमान खान, श्रीदेवी, हेमा मालिनी, दिलीप कुमार, वरुण धवन यांनी जुडवा भाऊ किंवा बहिणींची भूमिका केली होती. या जुळ्यांच्या कथेमुळे अनेक गमती जमती घडतात. त्यामुळे जुळ्यांची गंमत सगळ्यांनाच वाटते. त्यांचे एकमेकांसारखं दिसणे... हे तर सर्वांनाच त्यांच्याकडे आकर्षित करते.

औरंगाबाद शहरातील सनबीन नर्सरी स्कूलमध्ये असलेल्या भूमी आणि भाव्या या दोघी जुळ्या मुलींमुळे शाळेतील शिक्षिकाही अनेकदा संभ्रमात पडतात. भूमी पीयुष बोरा आणि भाव्या पीयुष बोरा या दोघींमध्ये इतके साम्य आहे की, दोघींमध्ये कोण भूमी आणि कोण भाव्या हे कधी कधी त्यांच्या आईवडिलांनाही समजत नाही. शाळेत दोघींमधला फरक समजावा यासाठी दोघींनाही वेगवेगळ्या वर्गातील तुकडीत टाकले आहे.

दोघींमधला एकसारखेपणा

भाव्या आणि भूमी या दोघींच्या जन्मामध्ये फक्त एक मिनीटाचा फरक आहे. या दोघी बहिणी अगदी एकसारख्या दिसतात. दोघींचे वजन, उंचीही एकसारखीच आहे. तसेच दोघींच्या आवडी निवडीही एकसारख्याच आहेत. एकीला जे कपडे आवडतात, अगदी त्याच स्वरूपाचे कपडे दुसरीलाही आवडतात. जेवणातही भाज्यांच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत. झोपीत एकीने कुस बदलली तर दुसरीही अचानकपणे कुस बदलते. इतकेच नव्हेतर; एक आजारी पडली की, दुसरीही आजारी पडते, असे त्यांच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. 

दोघींच्या निकालावर एकीचेच छायाचित्र 

या दोघींमुळे शिक्षकांची इतकी धांदल उडते की, भूमी म्हणून हाक मारलेली भाव्या असते, तर भाव्या म्हणून हाक मारलेली भूमी असते. दोघींमधील समानतेमुळे या वर्षीच्या दोघींच्या निकालपत्रकावर शिक्षकांकडून चुकीने एकीचाच फोटो लावण्यात आला होता. 

जुळे होण्यामागचे कारण काय? 

जुळ्या मुलांमध्ये एकमेकांसारखी दिसणारी (मोनोझायगोटिक) आणि एकमेकांसारखी न दिसणारी (डिझायगोटिक) असे दोन प्रकार असतात. जी जुळी मुले (मोनोझायगोटिक ट्‌विन्स) एकसारखी दिसतात, अशा प्रकारच्या बाळांमध्ये सारखेच जेनेटिक कम्पोझिशन्स असतात. कारण एका स्पर्मपासून ही जुळी बाळे तयार होतात. जी जुळी बाळे डिझायगोटिक ट्‌विन्स होतात, त्यांमध्ये दोन स्पर्म्सचा संबंध येऊन बाळाची निर्मिती होते. यामुळे या जुळ्या बाळांचे जेनेटिक कम्पोझिशनदेखील वेगवेगळे असते. या जुळ्यांच्या आवडीनिवडी लहानपणी जरी एकसारख्या असल्या तरी पुढे त्या बदलून जातात. तसेच लहानपणी दोघींही सोबत राहत असल्यामुळे इन्फेक्‍शनमुळे दोघीही एकाच वेळी आजारी पडू शकतात. 
- डॉ. मंजुषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Twins looks So Same Aurangabad Twins Story