घरासमोर कार का लावली म्हणताच केला गोळीबार, पाथरीतील घटना... 

धनंजय देशपांडे 
Wednesday, 9 September 2020

पाथरीत घरासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने प्रिस्टल ताणून गोळी मारल्याची घटना शहरातील अजीज मोहल्ल्यात (ता.आठ) रात्री साडेअकरा वाजता घडली. रात्री उशिरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेतील आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा कसून तपास करीत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पाथरीः घरासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने प्रिस्टल ताणून गोळी मारल्याची घटना शहरातील अजीज मोहल्ल्यात (ता.आठ) रात्री साडेअकरा वाजता घडली. रात्री उशिरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेतील आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा कसून तपास करीत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अजीज मोहल्ल्यात राहणारे सालम बिन साले बिन हवेल यांच्या घरासमोर शेजारी राहणारे महंमद बिन सय्यद बिन क्लेम चाऊस यांनी आपली (कार क्र. एमएच २१  सी- २३७४) लावली असता सालम यांनी महंमद चाऊस यांना आमच्या घरासमोर गाडी का लावली असे विचारले असता महंमद चाऊस यांनी तुझ्या बापाची जागा आहे का, पुन्हा बोललास तर जीवे मारीन अशी धमकी दिली व स्वतःच्या कमरेला असलेला प्रिस्टल रोखून सालम यांच्यावर एक गोळी मारली, या घटनेत सालम हे घाबरून घरात पळाले व गोळी दरवाजाला लागली. ही घटना रात्री साडे अकरा वाजता घडली. घटनेत प्रिस्टलमधून गोळी मारल्याचा आवाज परिसरात घुमल्याने गर्दी जमली होती. दरम्यान, रात्री उशिरा सालम बिन हवेल यांच्या फिर्यादीवरून महंमद बिन सय्यद बिन क्लेम यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग- नांदेड कारागृहातील ८१ कैद्यांना लागन
 
पंचनाम्यात अडथळा एकास शस्त्रासह अटक
पोलिस गोळीबाराच्या घटनेनंतर रात्री उशिरा आरोपी महंमद चाऊस यांच्या घरी पंचनामा करण्यासाठी गेले असता एक इसम पोलिसांना घरात येऊ देत नव्हता व तपासात अडथळा निर्माण करत होता. पोलिसांनी त्याची चोकशी केली असता त्याने त्याचे नाव महंमद नोशाद (रा.मुंबई) असे सांगितले. त्याच्याजवळ एक खंजीर सापडला. त्याला अटक केली आहे.

हेही वाचा - गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक

नऊ पथक केले रवाना 
घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पाथरी पोलिसांचे तीन, स्थानिक गुन्हे शाखेचे पाच तर एटीएसचे एक असे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. तर घटनेत गोळीबार झाल्याने तपासासाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे व फिंगर प्रिंट तपासणी पथक पाथरीत दाखल झाले आहे.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा. विभागीय पोलिस अधिकारी श्रावण दत्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why was the car parked in front of the house?, Parbhani News