पावसाने खरिपाला घेरले, लातूर जिल्ह्यात दहा दिवसांत ८० मिलिमीटर पाऊस

paus latur news
paus latur news

लातूर : जिल्ह्यात दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत असून, ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असून, या पावसाने खरिपाला चांगलेच घेरले आहे. दहा दिवसांत तब्बल ८० मिलिमीटर पाऊस झाला असून, गुरुवारी (ता.२०) अकराव्या दिवशीही तो सुरूच होता. यामुळे खरिपाच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला असून, काही पिकांची काढणी तसेच पिकांवरची फवारणीही खोळंबली आहे.काढणीला आलेले मूग जाग्यावर उगवत आहेत.


जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून (एक जून) पाऊस पडत आहे. जूनध्ये २१२ तर जुलैमध्ये १८२ मिलिमीटर पाऊस पडला असून, चांगल्या पावसामुळे यंदा खरिपांतील पिके जोमदार होती. पावसामुळे प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा झाला नसला तरी हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरला. यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पिके जोमदार होती. मूग काढणीला येताच पुन्हा पावसाने सुरवात केली. काढणीला आलेला मूग आता जाग्यावरच उगवत असून, पिके पिवळी पडली आहेत.

मुगाचे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पावसातच काढणी केली तरी उन्ह नसल्याने त्याची वाळवणी करता न आल्याने बुरशी लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनवर मावा व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी सुरू करताच पावसाने हजेरी लावली. यामुळे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला असून, या अळ्या आता शेंगा लागणाऱ्या फुलाखालील चट्ट्यापर्यंत पोचल्या आहेत. जिल्ह्यात मागील वीस दिवसांत ९३ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्यातील ८० मिलिमीटर पाऊस दहा दिवसांतील आहे. यात बुधवारी (ता.१९) दिवसभर व गुरुवारी सकाळपर्यंत बारा मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

सलग पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. यात मोठ्या क्षेत्रावरील काढणीला आलेला मूग जाग्यावर उगवत आहे. सोयाबीन पिकांवरील मावा तसेच पाने खाणाऱ्या अळींनी उचल खाल्ली असून, त्यांचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. सध्याचा पाऊस आणखी दोन दिवस असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून, पाऊस संपताच शेतकऱ्यांनी मावा व अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.
- आर. टी. मोरे, कृषी उपसंचालक, लातूर

(संपादन : गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com