esakal | परभणी जिल्ह्यात देवींच्या मंदिरात घटस्थापना भाविकांविना 
sakal

बोलून बातमी शोधा

charthana devi

जिल्ह्यात देवीची विविध रुपे असलेली मंदिरे आहेत. त्यांचे वेगळेपण तेथील कार्यक्रम आणि मंदिराच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या नवरात्रामुळे कायम आहे. मात्र, यंदा कोरोनाने मंदिरे बंद असल्याने जिल्ह्यात देवींच्या मंदिरात घटस्थापना विधिवत पार पडली. परंतू, भाविकांविना मंदिरात नवरा, दसरा साजरा केला जाणार आहे. 

परभणी जिल्ह्यात देवींच्या मंदिरात घटस्थापना भाविकांविना 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

सोनपेठ : दोनशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन संस्कृती असणाऱ्या सोनपेठ शहरातील श्री जगदंबा देवी संस्थानमध्ये शनिवारी (ता.१७) अत्यंत साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी तसेच २०१२ मध्ये अशी दोन वेळा जिर्णोद्धार केलेल्या श्री जगदंबा देवी मंदिरात नवरात्र उत्सव थाटात साजरा केला जातो. परंतू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत असून नवनवीन उपक्रमांचे आयोजन देखील रद्द करण्यात आले. साध्या पद्धतीने साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता (ता.३०) कोजागिरी पौर्णिमेला होणार आहे. यावर्षीचा नवरात्र उत्सव साजरा न करण्याचा निर्णय जगदंबा देवी संस्थांनच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने देखील घेण्यात आला. 

भोगाव-देवी संस्थानमध्ये नवरात्रोत्सवास प्रारंभ 
जिंतूर ः तालुक्यातील शक्तीपीठ असलेल्या भोगाव (देवी) येथील देवीसाहेब संस्थान येथे श्री जगदंबेच्या मंदिरात भाविकांविना करण्यात आलेल्या घटस्थापनेने शनिवार (ता.१७) पासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आल्याने येथील अडीचशे वर्षांच्या परंपरेला प्रथमच छेद बसला. दुपारी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबचंद राठी भगवानराव देशमुख, प्रल्हादराव देशमुख, नामदेव शेवाळे, सुभाषचंद्र तिवारी, प्रमोद पांडे, रितेश पांडे या पदधिकाऱ्यांच्या व पुजारी यांच्या उपस्थितीत जगदंबेच्या गाभाऱ्यात विधीवत घटस्थापना करण्यात आली. रोज पहाटे साडेचार वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा त्यानंतर महानैवेद्य तसेच सकाळ संध्याकाळ आरती, अनुष्ठान, गणपती अथर्वशीर्ष, सप्तशती, श्रीसुक्त पाठ,यजुर्वेद संहिता पारायण, भवानी सहस्त्रनाम याशिवाय विडा, पाळणा,प्रार्थना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाअष्टमी व महानवमी हे उत्सवातील महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. महाअष्टमीच्या रात्री कुमारिकेच्या पूजनाने होमपूजा प्रारंभ होऊन महानवमीच्या प्रभातसमयी सोहळ्याची पुर्णाहुती दिली जाते व दुपारच्या महाप्रसादानंतर संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. सोहळ्याचे पौरोहित्य जीवनगुरु जोशी भोगावकर हे करित आहेत. 

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यात ५७ कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू -

चारठाण येथील आगळे वेगळे देवी मंदिर... 
चारठाणा ः चारु म्हणजे सुंदर स्थान असलेल्या चारुस्थान अशी ओळख असलेल जिंतुर तालुक्यात चारठाणा या गावात ‘खुराची आई’ या नावे प्रसिध्द असलेले देवीचे मंदिरभारतात त्याच्या बांधणीमुळे आगळे वेगळे आहे. इतिहासकार प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांचे मते पूर्ण भारतात अशी रचना असलेली दुसरी वास्तू नाही. गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी या मंदिराची रचना असून पूर्ण दगडी बांधणीचे हे १२ व्या शतका अखेरीचे हेमाडपंती मंदिर आहे. गावच्या आख्यायिकेप्रमाणे या गावी हेमाडपंताने आपल्या वडील बहिणीसाठी बांधलेल्या ३६५ मंदिरात हे वेगळ्या धाटणीचे एकमेव देवी मंदिर आहे. याशिवाय एक गणपती मंदिर व बाकी सर्व शिव मंदिरे आहेत. विशेष म्हणजे या गावातील प्रत्येक मंदिराचे छताचा आकार व शिल्प वेगवेगळे आहे. त्यातही देवी मंदिराचे सभामंडपाचे छत हे वेगवेगळ्या दगडांवर गायीच्या खुरांचे शिल्प कोरून ते सर्व दगड एक मेकात गुंफून थेट बाजूच्या चारी भिंतीवर त्यांचा आधार साधला आहे. त्यामुळे सभा मंडपाला खांब नाहीत तर सर्व गोखुरांचाच आधार असल्याने या मंदिराला खुराची आई असेच संबोधले जाते. गाभाऱ्यात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी चामुंडा देवीची मूर्ती असावी पण ती भग्न झाल्यामुळे बाजूस हलवून तिचे जागी स्थानिकांनी रेणुका देवीचा तांदळा बसविला पुढे १९०२ मध्ये देविदासराव देशपांडे यांनी सध्याचा सुंदर व हास्यवदन तांदळा स्थापन केल्याचे सांगितले जाते. 


हेही वाचा - शरद पवारांच्या दौऱ्यात आमदार चौगुले यांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली

प्राचीन शिल्प पाहण्यास अनेकजण येतात 
गाभाऱ्यातील मूर्तीचे शीर्ष भागी असलेल्या मूळ दगडी चौकटीत वीणा वादिनी सरस्वतीचे शिल्प कोरलेले असल्याने हे मुळातच देवी मंदिर असल्याची पुष्टी मिळते. या व्यतिरिक्त गावात आणखी तीन देवी मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यात तुळजा भवानीचे ठाणे असलेली बुरुडाची देवी रंगारी समाजाची देवी व धोंडाबाई या देवी भक्त स्त्रीने स्थापन केलेली धोंडाई नवरात्रात या सर्व मंदिरात लोक दर्शनास येतात. तर खुराच्या आईचे प्राचीन शिल्प पाहण्यास इतिहास तज्ञ व अभ्यासक येत असतात. 

संपादन ः राजन मंगरुळकर