विनाकारण बाहेर फिराल तर गाडी होईल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020


लॉकडाउनच्या काळात घराच्या बाहेर न पडण्याबद्दल वारंवार विनंती व आवाहन करूनसुद्धा शहरात बिनधास्त फिरत आहेत. गुरुवारी (ता. १६) पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन मोटारसायकली जप्त करण्याची मोहीम राबविली. त्यामुळे मोकाट फिरणारे मिळेल त्या रस्त्याने मोटारसायकल घेऊन पळ काढतांना दिसून आले.

नायगाव, (जि. नांदेड) ः लॉकडाउनच्या काळात घराच्या बाहेर न पडण्याबद्दल वारंवार विनंती व आवाहन करूनसुद्धा शहरात बिनधास्त फिरत आहेत. गुरुवारी (ता. १६) पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन मोटारसायकली जप्त करण्याची मोहीम राबविली. त्यामुळे मोकाट फिरणारे मिळेल त्या रस्त्याने मोटारसायकल घेऊन पळ काढतांना दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सर्वच प्रकारे काळजी घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. या प्रयत्नामुळे नांदेड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नाने नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. तो आॅरेंज यादीत येऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

 

फिरणाऱ्यांना कुणाचेही काहीही देणेघेणे नाही
नागरिकांना मात्र शासन व प्रशासकीय यंत्रणेचे काहीएक सोयरसुतक आहे असे वाटत नाही. कारण नागरिक विविध कारणे दाखवून बिनधास्त शहरात फिरत आहेत. अनेक उपटसुंभ चुलत्याच्या, आईच्या, अन्य नातेवाइकांच्या रुग्णालयाच्या जुन्या फायली घेऊन नायगाव शसरासह तालुक्यात मोकाट फिरत आहेत. पोलिसांनी आडवल्यास औषधी घेण्यासाठी आलो असल्याचे खोटे कारण सांगितल्या जात आहे. वास्तविक असे फिरणाऱ्यांना कुणाचेही काहीही देणेघेणे नाही; पण बिनकामी फिरण्यासाठी अशा फायलींचा उपयोग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे.

 

नागरिक नियम मोडून रस्त्यावर
परिस्थिती हाताबाहेर न जाण्यासाठी नायगाव तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा काम करत असून लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात कामाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याबद्दल सक्त ताकीद देण्यात येत असतांना नागरिक व तरुण ही बाब गांभीर्याने घ्यायला तयारच नाहीत. काहीही काम नसतांना केवळ गुटख्याच्या पुड्या घेण्यासाठी मोटरसायकलींवर तिघे - तिघे बसून फिरत आहेत. वारंवार आवाहन करूनही नागरिक नियम मोडून रस्त्यावर येत असल्याने गुरुवारी नायगाव पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा -  १८ कॅम्पमध्ये ९३३ नागरिकांची सोय

दुपारनंतर शहरात शुकशुकाट
रस्त्यावर फिरणाऱ्यांना अडवून कशासाठी बाहेर निघालात याची विचारणा करून सांगितलेले कारण खरे असेल तर सोडत असून जर खोटे कारण असेल तर महाप्रसाद देऊन मोटारसायकल जप्त करण्याची मोहीम राबविली. गुरुवारी नायगावचा आठवडे बाजार असल्याने कुणीही भाजीपाला घेऊन येऊ नये, असे आवाहन करतानाच मोकाट व नियम मोडून मोटारसायकलवर फिरणाऱ्यांवरही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पाटेकर व त्यांची टीम कारवाई करत असल्याने अनेक उपटसुंभ रस्ता मिळेल त्या मार्गाने मोटारसायकल घेऊन पळ काढताना दिसून आले. गुरुवारी नायगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन मोटारसायकल जप्त करण्याबरोबरच कारवाईची मोहीम राबविल्याने दुपारनंतर शहरात शुकशुकाट होता. त्यामुळे लॉकडाउन व संचारबंदी असल्याची परिस्थिती दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without getting out, the motarcycle will be seized, nanded news