चाकुरात महिलेची आत्महत्या, किल्लारीत सोळा जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत शेटे / विश्वनाथ गुंजाटे
शुक्रवार, 22 मे 2020

शेतीच्या वाटणीच्या कारणावरून एका महिलेला सहाजणांनी मारहाण करून डोके फोडले व सततच्या त्रासामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर येथे शुक्रवारी (ता.२२) घडली.

चाकूर (जि.लातूर) : शेतीच्या वाटणीच्या कारणावरून एका महिलेला सहाजणांनी मारहाण करून डोके फोडले व सततच्या त्रासामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२२) घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेशनगर भागात राहणाऱ्या अनिता अंतेश्वर पटणे (वय २६) यांचा शेताच्या वाटणीच्या कारणावरून वाद होता.

यामुळे गुरुवारी (ता.२१) दुपारी त्यांना दीर बालाजी तुकाराम अंदुरे, जाऊ अश्विनी बालाजी अंदुरे, जावेची आई शांताबाई शिवाजी पटणे, भाऊ राजकुमार शिवाजी पटणे, बहीण संगीता पटणे, छकुली शिवाजी पटणे (रा. सर्व चाकूर) यांनी मारहाण केली होती. याबाबत अनिता हिने रात्री पोलिस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर रात्री अनिताने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करायचे नाही, असा पवित्रा तिच्या माहेरच्या मंडळींनी घेतला होता. याबाबत संदीप मुगावे यांच्या फिर्यादीवरून वरील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड व रामचंद्र गुंडरे करीत आहेत.

पंचावन्न वर्षांपुढील नागरिकांची तपासणी करा, विभागीय आयुक्त केंद्रेकरांचे निर्देश

अलगीकरण आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सोळा जणांवर गुन्हा दाखल
किल्लारी (जि.लातूर) : मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून किनीनवरे (ता. औसा) येथे आलेल्या सोळा पाहुण्यांवर अलगीकरणाचे उल्लंघन केल्याने शुक्रवारी (ता.२२) किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किनीनवरे येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पाहुण्यांनी घरामध्ये अलगीकरण करून राहण्याचा आदेश असतानाही घरात एकत्र राहत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील लोक गावातील इतर लोकांच्या संपर्कात येत आहेत. ज्या लोकांना पाच दिवस, सात दिवस अलगीकरणात राहण्याचे आदेश आहेत तेही लोक सर्वांमध्ये मिसळत आहेत.

तोंडाला मास्क लावत नाहीत. शारीरिक अंतर ठेवत नाहीत. गावात फिरत आहेत. अशांमुळे गावावर कोरोना विषाणूसारखे संकट ओढवू नये, त्यामुळे गावच्या सरपंचांनी पोलिसांना याची माहिती देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले. याप्रकरणी सरपंच दत्तात्रय नानासाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रियंका बाळू कांबळे, श्रेया बाळू कांबळे, सानवी बाळू कांबळे, सतीश दगडू लोंढे, फर्माज इस्माईल शेख, सना इस्माईल शेख, अल्फिया शेख, बालाजी दगडू कांबळे, नामदेव संजय मोतीबोजे, धनराज अर्जुन किनीकर, रेश्मा धनराज किनीकर, दिशा धनराज किनीनवरे, धीरज धनराज किनीकर, मीना मारुती गाडीकर, गहिनीनाथ आदिनाथ साकोळे, मनोज व्यंकट कुंभार (सर्व राहणार किनीनवरे) यांच्याविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Committed Suicide In Chakur