डेंगीने बाळंतिणीचा मृत्यू, आैरंगाबादमधील बारावा बळी

योगेश पायघन
रविवार, 8 डिसेंबर 2019

डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला.

औरंगाबाद : डेंगीने चिश्‍तिया कॉलनीतील एका बाळंतिणीचा शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाल्याची घटना समोर आली. डेंगीमुळे शहरातील हा बरावा बळी ठरला आहे. मुस्कान शहा (वय 19, रा. चिश्‍चिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर येथेही पूनम वाघमारे (वय 19) या बाळंतिणीचा डेंगीने मृत्यूची झाल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या घटनेत घाटी रुग्णालयात गरोदर असलेल्या मुस्कान शहा यांना डेंगीच्या उपचारासाठी बुधवारी (ता. चार) दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. पाच) त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. दरम्यान, बाळाचा पोटातच मृत्यू झालेला होता. त्यावेळी त्यांच्या प्लेटलेट्‌स सतरा हजारांपेक्षा खाली आल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले; तर एपिलिप्सी आणि ऍनिमियाचाही मुस्कानला त्रास होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान...

पंढरपुरातील महिला मृत्युमुखी

दुसऱ्या घटनेत 30 नोव्हेंबरला पूनम वाघमारे यांनाही डेंगीच्या उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली; मात्र त्यांच्या प्लेटलेट्‌स 27 हजारांवर आल्या होत्या. उपचारादरम्यान इन्फेक्‍शन झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला, असेही घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गरोदपणात काळजी घ्या! 

डेंगीचा प्रादुर्भाव झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डेंगी, कावीळची लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांना तत्काळ दाखविले पाहिजे. डेंगी, कावीळचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येणे शक्‍य होते; पण इन्फेक्‍शन झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे गरोदरपणात काळजी घेण्याचा सल्ला घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिला.

शहरात 22 संशयितांवर उपचार

गेल्या तीन महिन्यांपासून डेंगीचा शहरात कहर सुरू आहे. डिसेंबरच्या सहा दिवसांत शहरात 22 संशयित रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगत काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ऍबेटिंग, धूरफवारणी, घरोघरी पाहणी सध्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies due to dengue in Aurangabad