सास्तूर बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांची मागणी

अविनाश काळे
Thursday, 5 November 2020

राज्य सरकारने महिलांच्या सूरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना व कायदा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर (मुंबई) यांनी केली.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्यात महिला, मुलीवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. राज्य सरकार मात्र कायदा व सुरक्षिततेच्या बाबतीत अपयशी ठरत आहे. सास्तूर (ता.लोहारा) येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा प्रकार गंभीर आहे. राज्य सरकारने महिलांच्या सूरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना व कायदा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर (मुंबई) यांनी केली.

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (ता.पाच) उमरगा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे नियोजन होते. मात्र प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यामुळे काही मोजके कार्यकर्त्यांनी तहसीलदार संजय पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. सास्तुर येथील एका मुलीवर चार नराधमानी अत्याचार केल्याने त्या मुलीची प्रकृती गंभीर आहे.

मंदिरे खुली करा, कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर साधु-संतांचा एल्गार!

चार जणांनी अत्याचार केलेला असताना तिन आरोपीला अटक करण्यात आले आहे. तर एका सोडून देण्यात आले आहे. गेल्या एक वर्षांपासून लहानमुली व महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सास्तुर येथील बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. पीडित मुलीच्या घरच्याना संरक्षण देण्यात यावे. आरोपीला लवकरात-लवकर फाशी देऊन पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारूती बनसोडे, जिल्हा प्रवक्ता रामभाऊ गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे, उमरग्याचे तालुकाध्यक्ष बाबुराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर गायकवाड, कोषाध्यक्ष चद्रकांत जोगी, जिल्हा सल्लागार बालाजी परताळे, कृष्णा जमादार, कालिंदी घोडके, अंकुश लोखंडे आदींची उपस्थिती होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Unsafe In State, Wachit's Women Front Chief Thakur Critise State