दिल्लीतून निघाली, पंधरा दिवसांनंतर गल्लीत पोहोचली : निलंग्यातील मायलेकरांचा गाव गाठण्यासाठी प्रवास

राम काळगे
Friday, 8 May 2020

निलंगा शहरातील एक महिला, मुलगी व लहान मूल पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीहून चालत निघाले होते. वाटेमध्ये प्रवास करीत असताना काही ठिकाणी मिळेल त्या वाहनाने तर कांही ठिकाणी पायी प्रवास करीत पंधरा दिवसापासून निघालेले या तिघांना निलंग्यापर्यंत पोहोचायला अनेक संकटाचा सामना करावा लागला.

निलंगा (जि. लातूर) : स्वतःचे गाव गाठण्यासाठी संकटकाळात कोण कसा प्रवास करेल, हे सांगणे अवघड झाले आहे. असाच प्रवास निलंग्याच्या मायलेकीने दिल्लीपासून ते थेट गल्लीपर्यंत केलेला आहे. पंधरा दिवसांपासून प्रवासातले वेगवेगळे अडथळे पार करीत अखेर तिने आपले गाव, घरही गाठले, मात्र हा प्रकार जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आल्याने माय, लेक व लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी, की मागील दोन-तीन वर्षांपूर्वी रोजगारासाठी काही कुटुंबातील व्यक्ती शहराकडे गेलेल्या आहेत. मात्र सध्या कोरोनामुळे शहरी भागात गेलेल्या लोकांनाही आपल्या गावाची आठवण अशा स्थितीत येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक शहरांमध्ये असलेले नागरिक आपल्या गावाकडे परतत असताना दिसत आहेत.

रेल्वे अपघातात १५ मजूर ठार, पायी गावाकडे निघाले होते

निलंगा शहरातील एक महिला, मुलगी व लहान मूल पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीहून चालत निघाले होते. वाटेमध्ये प्रवास करीत असताना काही ठिकाणी मिळेल त्या वाहनाने तर कांही ठिकाणी पायी प्रवास करीत पंधरा दिवसापासून निघालेले या तिघांना निलंग्यापर्यंत पोहोचायला अनेक संकटाचा सामना करावा लागला. सकाळी आपल्या घरातील पालीमध्ये पोहोचताच त्या गल्लीतील काही जागरूक नागरिकांनी या तिघांनाही पाहिले व ही माहिती थेट निलंग्याच्या नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांच्या कानावर घातली.

नगराध्यक्षांनी लागलीच या बाबतची माहिती प्रशासनाला कळवून या कुटुंबातील आठ ते नऊ जणांना क्वारंटाईन करण्यासाठी प्रयत्न केले. तर आई, मुलगी व लहान लेकरू या तिघांनाही लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या तिघींचाही पंधरा दिवसांतील प्रवास पाहताना चिंतेचे वातावरण निर्माण होण्यासारखी असून संबंधित प्रवासातील महिलेने दिल्ली-मालेगाव असा प्रवास करीत निलंगा गाठल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मालेगावातील तीन दिवस असलेला मुक्काम धोक्याचा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या अहवालावरूनच निलंगेकराची चिंता मिटणार आहे.

औरंगाबादमध्ये ५० कोरोना हॉटस्पॉट, कोणते ते वाचा

दरम्यान, दोन महिला आणि लहान लेकरू दिल्लीपासून स्वतःचे गाव गाठणाऱ्या गल्लीपर्यंत किती खडतर प्रवास करत आले, याबाबतचे नवल सर्वांनाच वाटत आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत गाव गाठण्यासाठी केलेल्या प्रवास म्हणजे संकट काळामध्ये गाव गाठण्यासाठीची धडपड दिसत आहे. शिवाय ग्रामीण भागामध्येसुद्धा पुणे, मुंबई या शहरांमधून अनेक तरुण यापूर्वी दाखल झाले आहेत. अधिकृत पास काढून येणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांसमोर बाहेरगावाहून येणाऱ्यांचे नवीन संकट उभे राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Walked From Delhi To Nilanga Latur In Lockdown