जालन्यात बतावणी करून महिलेचे दागिने लंपास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

तुमच्या मुलाने मला फोन करून तुमच्याकडे पाठविले आहे. घरकुलासाठी तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत, मणी, डोरले, कानातील सोन्याची फुले घेण्यास सांगितले आहे, अशी त्या भामट्याने बतावणी केली

जालना - तुमच्या नावे घरकुल आले आहे. त्यासाठी तुमच्या मुलाने मला तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत, मणी, डोरले, कानातील सोन्याची फुले घेऊन येण्यास फोन करून सांगितले आहे, अशी बतावणी करून एका भामट्याने गुरुवारी (ता. 13) सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान एका ज्येष्ठ महिलेस तब्बल साडेपंधरा हजार रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान, याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?  

शहरातील तुळशीपार्क परिसरातील भवानीनगर येथील रंगूबाई यशवंतराव भुतेकर (वय 65) या गुरुवारी (ता.13) सकाळी अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरी होत्या. याच वेळेत एक अनोळखी व्यक्‍ती हा रंगूबाई भुतेकर यांच्या घरी आली. त्याने रंगूबाई भुतेकर यांना सांगितले की, तुमच्या नावावर घरकुल मंजूर झाले आहे. त्यामुळे तुमच्या मुलाने मला फोन करून तुमच्याकडे पाठविले आहे. घरकुलासाठी तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत, मणी, डोरले, कानातील सोन्याची फुले घेण्यास  सांगितले आहे, अशी त्या भामट्याने बतावणी केली. या बतावणीला रंगूबाई भुतेकर भुलल्या आणि त्यांनी आठ हजार रुपयांची सोन्याची पाच ग्रॅमची पोत, अडीच ग्रॅमचे चार हजार रुपयांचे डोरले, एक मणी व दोन ग्रॅमचे साडेतीन हजारांची कानातील सोन्याची फुले असा एकूण साडेपंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल त्या अनोळखी व्यक्‍तीला दिला. सोन्याचे दागिने घेतल्यानंतर ही व्यक्‍ती पसार झाली.

हेही वाचा : राजेश नहारचा गोळ्या झाडून खून 

त्यानंतर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर रंगूबाई भुतेकर यांनी थेट कदीम जालना पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. शेख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 

ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी लंपास 

मंठा येथील बसस्थानकावर बसगाडीत चढत असताना ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी पळवली आहे. 
सेलू तालुक्‍यातील बोरकिनी येथील तारामती आश्रुबा मुसळे (वय 70) या बुधवारी (ता.12) दुपारी एक वाजेच्या सुमारास मंठा येथून परतूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत होत्या. तेव्हा त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी पळविली आहे. ही बाब बस मंठ्यापासून तीन किलोमीटर पुढे तळणी फाट्यापर्यंत गेल्यावर तारामती यांच्या लक्षात आली. त्यांनी याप्रकरणी गुरुवारी (ता.13) मंठा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव चव्हाण करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women's jewelry theft in Jalna