
परभणी - राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता.दोन) पासून सातव्या वेतन आयोगसह इतर मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेकडो अधिकारी - कर्मचारी सोमवारपासून आंदोलनात उतरले आहेत.
या आंदोलनात राज्यातील चार विद्यापीठातील 5 हजार अधिकारी कर्मचारी व परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील 1 हजार 400 कर्मचारी सहभागी झाले आहेत. विद्यापीठ सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना 10, 20 व 30 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आपली नाराजी राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील चार ही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी सोमवार, ता. दोन नोव्हेंबर पासून आंदोलना सहभागी झाले आहेत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेकडो अधिकारी - कर्मचारी सोमवारपासून आंदोलनात उतरले आहेत. ता. पाच नोव्हेंबर पर्यंत हे अधिकारी, कर्मचारी निरनिराळ्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकणार आहेत.
घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले
परंतू राज्यातील चार ही कृषी विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता (गो संशोधन प्रकल्प, शेळी संशोधन प्रकल्प, सुरक्षा सेवा, पाणी पुरवठा सेवा, वैद्यकीय सेवा या वगळून) विद्यापीठ क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थित राहून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली. परंतू कोणत्याही कामाला सुरुवात केली नाही. कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन काम अथवा प्रक्षेत्राविषयक कामे न करता लेखनी बंद आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठातील कुलुगुरु यांच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 11 वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. सामाजिक अंतर राखून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
सातवा वेतन आयोग लागू करावा
राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सर्व विभागांना सातवा वेतन आयोग देण्यात आला आहे. परंतू कृषी शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले. यातून राज्य शासनाचा दुजाभाव दिसून येतो. त्यासाठी राज्य शासनाने या अधिकारी - कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा अशी आमची मागणी आहे.
- प्रा. दिलीप मोरे, अध्यक्ष, मराठवाडा कृषी विद्यापीठ कर्मचारी संघ,
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.