जागतिक पर्यटन दिन - औंढा नागनाथ भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण 

कृष्णा ऋषी 
Sunday, 27 September 2020

तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र असे दोन्ही पद्धतीने  औंढा नागनाथ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पांडवकालीन या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची निर्मिती झाली आहे. हेमाडपंती भव्य अशी पूर्ण दगडांमध्ये जवळपास पाच एकर क्षेत्रात शंभर फूट उंचीचे भव्य कोरीव काम केलेले प्राचीन मंदिर आहे. या मंदिरावर चारही युगांची शिल्पे कोरलेली आहेत. वास्तुशास्त्रातील श्री यंत्रावर आधारित मंदिर उभारले असल्याने या मंदिराला पायाच नाही.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) - औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे ठिकाण अत्यंत रमणीय व विलोभनीय आहे. या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. चारही बाजूला असलेले मोठमोठे डोंगर, दऱ्या तसेच तिन्ही बाजूस तलाव आणि डोंगररांगांमधून वाहणारे पाणी व हिरवळ नेहमीच भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण असते. श्रावण महिना पावसाळ्यात येत असल्याने भाविक शिवभक्त तसेच निसर्गप्रेमी पर्यटक नेहमीच याचा आनंद घेत असतात. 

तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र असे दोन्ही पद्धतीने  औंढा नागनाथ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पांडवकालीन या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची निर्मिती झाली आहे. हेमाडपंती भव्य अशी पूर्ण दगडांमध्ये जवळपास पाच एकर क्षेत्रात शंभर फूट उंचीचे भव्य कोरीव काम केलेले प्राचीन मंदिर आहे. या मंदिरावर चारही युगांची शिल्पे कोरलेली आहेत. वास्तुशास्त्रातील श्री यंत्रावर आधारित मंदिर उभारले असल्याने या मंदिराला पायाच नाही. या ठिकाणी दर्शनासोबत पर्यटन व्हावे म्हणून अत्यंत सुंदर असे नागनाथ उद्यान तयार केले आहे. त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या तलावात बोटिंगही सुरू केलेली आहे. 

हेही वाचा - महिला रुग्णांसाठी गुड न्यूज : कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड

भाविकांसह पर्यटकांसाठी विविध सोयी
उंच डोंगरावर वनखात्याने निसर्ग उद्यान उभारले आहे. त्यामुळे पर्यटक निसर्ग खूप जवळून पाहू शकतात. तसेच भाविक, पर्यटकांना राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवास, नागनाथ संस्थानचे भक्त निवास व खासगी यात्री निवास, लॉजचीही निवासासाठी व्यवस्था आहे. विमान, रेल्वेसह स्वतःच्या वाहनाने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 
 
वनउद्यान आकर्षण
वन उद्यान तयार झाल्याने तसेच नक्षत्र उद्यान विकसित झाल्याने येणारे पर्यटक निसर्गाचा जवळून अभ्यासही करीत असतात. निसर्गाशी मानवाचे असलेले साम्य या ठिकाणी पाहायला मिळते. हजारो विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे या ठिकाणी आम्ही जोपासतो आहोत. 
- माधव केंद्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी. 

हेही वाचा - आमदार श्यामसुंदर शिंदे कोरोना बाधित, मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

विकास आराखडा तयार
तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ हे येणाऱ्या काळात पर्यटन व आध्यात्मिक क्षेत्रात कसे अग्रेसर होईल तसेच काय काय उपाययोजना करता येतील त्यादृष्टीने आम्ही शासनस्तरावर विकास आराखडा तयार करून त्याची पूर्तता करीत आहोत. देवस्थानासाठी शासनाकडून निधीची कमतरता जाणवू देणार नाही. देवस्थानचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 
- संतोष बांगर, आमदार व अध्यक्ष सल्लागार, संस्थान. 

(संपादन - अभय कुळकजाईकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tourism Day - Aundha Nagnath attracts devotees as well as tourists, Hingoli news,